महाराष्ट्रातील विजयाने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह : तानावडे

जनतेने विरोधकांना जागा दिली दाखवून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
महाराष्ट्रातील विजयाने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह  : तानावडे

पणजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे गोव्यासह देशभरातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेल्या कामाला महाराष्ट्रातील जनतेने विजयाची पावती दिली, असे राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर प्रदेश भाजपने पणजीती​ल कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी तानावडे बोलत होते. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी चुकीचा प्रचार केला. भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास संविधान बदलण्यात येईल अशी भीती घातली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. परंतु, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांत तेथील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. झारखंडमध्येही यावेळी भाजपच्या जागा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील का​ही मंत्री, आमदारांनी महाराष्ट्रात जाऊन प्रचार केला. तेथील कार्यकर्त्यांत स्फूर्ती आणली. त्याचाही पक्षाला फायदा मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना आखून त्या जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे भाजपशिवाय पर्याय नाही, हे देशभरातील जनतेला कळून चुकलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध राज्यांतील निवडणुकांत जनतेने भाजपलाच कौल दिलेला आहे. पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशभरातील जनता त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहत असल्याचेही तानावडे यांनी नमूद केले.