कांपाल परेड मैदानावर भूमिपूजन सोहळा उत्साहात; वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : बालभवन नजीकचे दयानंद बांदोडकर मार्गावरील कांपाल येथील श्री बाल गणेश मंदिराचे लवकरच स्थलांतर होणार आहे. शेजारील कांपाल परेड मैदानावर या मंदिराचे स्थलांतर करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी १२ वा. या मंदिरासाठीचे भूमिपूजन पार पडले.
भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित पुरोहित राजू हेगडे, यजमान श्री. व सौ. प्रतिमा प्रकाश वाडजी, देवस्थानचे पदाधिकारी व मान्यवर.
दयानंद बांदोडकर मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा बोजा वाढत आहे. बालभवन नजीक वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दर मंगळवारी, तसेच संकष्टी, गणेश जयंती, गणेशचतुर्थी, वर्धापन दिन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात येते. या मंदिरात दर्शनासाठी दररोज येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. वाहन पार्किंगसाठीही अपुरी जागा असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. जवळच बालभवनची शाळा असल्याने शाळ सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पालकांची गर्दी होत होती. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर या पुरातन मंदिराचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी दुपारी १२ वा. कांपाल परेड मैदानावर श्री बालगणेश मंदिराचे भूमिपूजन धार्मिक वातावरणात पार पडले. पुरोहित राजू हेगडे यांच्या पौरोहित्याखाली विविध धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमाचे यजमानपद श्री. व सौ. प्रतिमा प्रकाश वाडजी यांनी भूषविले. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.