३.५० लाखांपैकी २ लाख रूपये रोकड हस्तगत
म्हापसा : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टॅक्सी स्टँडजवळील काजूविक्रीच्या दुकानातून ३.५० लाख रूपयांची रक्कम चोरी केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली व त्यांच्याकडून चोरीतील २ लाख रूपये रक्कम जप्त केली. कालू राम (१९, रा. काणका व मूळ राजस्थान), जुहारा राम (२४, राजस्थान), व नारायणलाल चौधरी (३५, राजस्थान) अशी संशयितांची नावे असून कालू राम हा सदर दुकानात कामाला होता. कालू रामला म्हापसा पोलिसांनी तर जुहारा राम व नारायणलाल या दोघांना राजस्थान पोलिसांच्या सहाय्याने ताब्यात घेत अटक केली.
ही चोरीची घटना गेल्या ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. याप्रकरणी दुकान मालक सुरेंद्रसिंग पुरोहित यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दि. ३० व ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री या घटनेला मूर्तस्वरप देण्यात आले. संशयितांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला व दुकानात फिर्यादींनी ठेवलेली ३ लाख ५० हजार रूपये रोख रक्कम पळवून नेली .
दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी या संशयितांचा माग काढला होता. चोरीच्या घटनेपासून संशयित कालू राम हा फरार होता. संशयित जुहारा राम नारायणलाल चौधरी हे दोघे संशयिताचे मित्र आहेत व अधूनमधून त्यांची गोव्यात ये जा असायची. पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्सटेबल आनंद राठोड, अनिल राठोड, प्रथमेश मोटे, अक्षय पाटील व प्रकाश पोळेकर या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.