महाराष्ट्र : महायुतीचा वारू चौफेर उधळला; मविआची उडाली धूळधाण

महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर महाविकास आघाडीसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
महाराष्ट्र :  महायुतीचा वारू चौफेर उधळला; मविआची उडाली धूळधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल लागून एकंदरीत चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप प्रणीत महायुतीच पुन्हा महाराष्ट्रात सरकार बनवणार आहे. पण या निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास दाखवल्याने महाविकास आघाडीचे पुरतेच पानिपत झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचे लाजिरवाने पराभव झाल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे काल महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झाला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरले. अमोल खताळ यांनी थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यांना संगमनेरमधून पराभवाचे तोंड पहावे लागले. या धक्कादायक निकालांनी  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. 

दरम्यान काँग्रेसचेच अन्य दिग्गज नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील कराड दक्षिणमधून पराभव झाला आहे. याच प्रमाणे तिवसा येथील निवडणुकीत जेष्ठ नेत्या यशोमती ठाकूर याचा १० हजारांच्या अंतराने पराभव झाला असून, लातूर ग्रामीण येथून धिरज देशमुख यांचा देखील जोरदार पराभव झाला आहे. 

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघातून भाजपाचे देवेंद्र कोठे विजयी झाले आहेत. सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ भाजपला कधीच लाभला नव्हता. या मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. येथून काँग्रेसचे चेतन नरोटे यांचा ४० हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे.

महाविकास आघाडीची धुळधाण 

दुपारी २ वाजेपर्यंत महायुती २२४ जागांवर तर महाविकास आघाडी ५८ जागांवर आघाडीवर होती. अशा स्थितीत त्यांच्यासमोर आता  विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीचे संकट उभे ठाकले आहे. पक्षनेतेपदाच्या खुर्चीसाठी एका पक्षाकडे किमान २८ जागा असणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या जागा देखील मिळवता न आल्याने महाविकास आघाडीसमोर अनेक प्रश्न उभे ठाकलेत .  शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसकडे एक राज्यसभा खासदार निवडुन आणण्याइतपतदेखील संख्याबळ नाही.  यामुळेच प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत तसेच शरद पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग अत्यंत खडतर बनला आहे. 

हेही वाचा