सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूकप्रकरणी होते कोठडीत
पणजी। फोंडा। मडगाव : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवत फसणूक प्रकरणी अटकेत असलेल्या पूजा नाईक, श्रुती प्रभूगावकर, योगेश शेणवी कुंकळीकर, विषया गावडे व सोनिया उर्फ रोशन आचारी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कालापूर - तिसवाडी येथील एका महिलेला ६ लाखांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित आरोपी पूजा नाईक हिला अटक केली होती. तिला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ३० हजार रुपये व इतर अटींसह सशर्त जामीन मंजूर केला.
कालापूर - तिसवाडी येथील सुषमा सदाशिव नाईक यांनी पोलिसांत बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, हा फसवणुकीचा प्रकार दि. ५ ते ९ सप्टेंबर २०२० मध्ये घडला होता. संशयित पूजा नाईक हिने तक्रारदार महिलेला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात वरील काळात तिच्याकडून ६ लाख रुपये रक्कम घेतली. मात्र, संशयित महिलेने ठरल्याप्रमाणे नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत. हा पैसे देवाणघेवाणचा प्रकार पणजी परिसरात घडल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली. याची दखल घेऊन पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस यांनी संशयित पूजा नाईक विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलिसांनी शनिवार, दि. १६ रोजी संशयित पूजा नाईक हिला अटक केली होती. त्यानंतर तिला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती.
याच दरम्यान पूजा नाईक हिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेऊन तिला ३० हजार रुपये व इतर अटींसह सशर्त जामीन मंजूर केला आहे.
योगेश शेणवी कुंकळीकर या शिक्षकाचा सुद्धा जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. तर, नौदलात नोकरी देण्याचे आश्वासन देत १६ लाखांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संशयित विषया गावडे व सोनिया उर्फ रोशन आचारी यांना मडगाव न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.
फोंडा परिसरातील अनेक जणांना सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने शिक्षक असलेल्या योगेश शेणवी कुंकळीकर याने अंदाजे १ कोटी २० लाख रुपये घेतले होते. पण, सरकारी नोकरी मिळाली नसल्याने एका पालकाने फोंडा पोलीस स्थानकात शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली होती.
न्यायमूर्तिनी श्रुती प्रभूगावकर हिचा जामिनासाठी केलेला अर्ज मंजूर केला आहे. तर, योगेश शेणवी कुंकळीकर याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. यापूर्वी न्यायालयाने योगेश शेणवी कुंकळीकर याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
सोनिया, विषया यांना अटींसह जामीन
संशयित सोनिया आचारी व विषया गावडे यांनी मडगाव न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. न्यायालयात मडगाव पोलिसांनी संशयितांना जामीन देण्यास विरोध दर्शवलेला होता. सुनावणीवेळी संशयितांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. ५० हजारांचा वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रकमेचा हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्यातून बाहेर जाता येणार नाही, संशयितांनी तपास अधिकार्याकडे कायमस्वरुपी व सध्याचा पत्ता, पासपोर्टची प्रत जमा करावी, तपासकामात सहकार्य करावे, पुरावे नष्ट करण्यात येऊ नयेत, अशा अटीशर्ती न्यायालयाकडून घालण्यात आलेल्या आहेत.