महायुती, मविआचा स्पष्ट बहुमताचा दावा : देशाचे लक्ष
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
मुंबई : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा शनिवार, २० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. ६५.११ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती आणि महाविकास आघाडी यांनी स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे. झारखंड विधानसभेसाठी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान पार पडले होते. येथे प्रामुख्याने झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजप यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही राज्यांतील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
शनिवारी सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ पर्यंत कोणाचे सरकार येईल, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत सर्वच मतदारसंघांचा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मतदानाच्या ठिकाणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बारामती, वरळी, माहीम, सोलापूर, कोल्हापूर येथील लढती चुरशीच्या झाल्या असून येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
बहुतांश एक्झिट पोल्सनी महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. तर काही एक्झिट पोल्सनी महायुती सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमतासाठी दूर राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत लहान पक्ष, अपक्ष महत्त्वाचे ठरू शकतात. त्यांच्या पाठिंब्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर शुक्रवारी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहीर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. विशेष म्हणजे बैठक सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला. सत्तेतील आमदार मी असेन, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही, मला खात्री आहे. शनिवारी रात्रीच आम्ही महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. १६० ते १६५ जागांवर महाविकास आघाडी जिंकेल, हे खात्रीशीर सांगतो.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. १६० पेक्षा जास्त जागा येणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार निवडून येतील. एक मताने का होईना पण युगेंद्र आमदार होतील. भाजपाकडे प्रचंड पैसा आहे, निवडणुकीत त्यांनी कोटीच्या कोटी वाटले, त्यामुळे आताही ते पैसे वाटणार, अपक्ष आमदारांना पैसे देणार, भाजपाला अजून काय येते, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.
मुख्यमंत्रिपदावरून वाद नाही : चेन्नीथला
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल. जास्त मतदान झाल्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल. त्रिशंकु विधानसभेचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील.