पारोडा येथील महिलेचा खून

केपे पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


23rd November, 12:30 am
पारोडा येथील महिलेचा खून

न्यूज डेस्क । गोवन वार्ता
केपे : लंडनहून गावी आलेली मोडेवाडो-पारोडा येथील उबालिना ब्रागांझा ही ५७ वर्षीय महिला गुरुवारी तिच्या घरात दुपारी मृतावस्थेत आढळून आली. तिचा चेहरा विद्रूप करण्यात आल्याचे दिसून आले. शिवाय घरातील दागिने व पैसे गायब असल्यामुळे तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केपे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उबालिना हिचा मृतदेह शेजाऱ्यांना आढळून आला. तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. घरातील दागिने व पैसे गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. केपे पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत आहेत. घराच्या नूतनीकरणाचे काम करण्यासाठी उबालिना लंडनहून मोडेवाडो-पारोडा येथील घरी आली होती. ती दोन दिवसांत लंडनला परतणार होती. मात्र त्याआधीच तिचा खून झाला.