ब्रेक-अप झाल्यास बलात्काराचा गुन्हा नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


23rd November, 12:17 am
ब्रेक-अप झाल्यास बलात्काराचा गुन्हा नाही

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पुरुष आणि महिलेचे प्रेमसंबंध सहमतीने असतील आणि त्यानंतर या दोघांचे ब्रेक अप झाले, तर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे एका प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. एका महिलेने तिच्या प्रियकराने लग्नाचे वचन देऊन वारंवार बलात्कार केला, अशी तक्रार दिली होती. त्या प्रकरणात हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
पीडित महिलेने २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये तिने हा आरोप केला होता की, प्रियकराने लग्नाचे वचन देऊन तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. त्याने धमकी दिली होती की, लैंगिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या कुटुंबाला इजा पोहोचवेन. या तक्रारीनंतर कलम ३७६ (२) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून याचिकाकर्त्याने अर्ज दाखल केला होता. त्यासाठी आधी दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने महिलेने केलेले आरोप तथ्यहीन आहेत, असे म्हटले. न्यायालयाने या प्रकरणात लैंगिक शोषण किंवा बलात्काराचा गुन्हा नोंदवता येणार नाही, असे स्पष्ट केले.
सहमतीने संबंध असल्यामुळे गुन्हा होऊ शकत नाही !
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यांनी सांगितले, ज्या नात्यात सहमतीने प्रेमसंबंध ठेवण्यात आले आहेत, शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आहेत अशा नात्यांमध्ये ब्रेक अप झाले म्हणजेच ते नाते तुटले म्हणून पुरुषावर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होणार नाही. अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही.