नव्या सर्व्हेक्षण अहवालानंतरच रेती उपशास पर्यावरणीय दाखले

प्रक्रिया पुन्हा रेंगाळण्याची शक्यता


23rd November, 12:16 am
नव्या सर्व्हेक्षण अहवालानंतरच रेती उपशास पर्यावरणीय दाखले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रेती उपशासाठी फोंडा परिसरात निश्चित केलेल्या काही झोनचा समावेश दक्षिण गोव्यात, तर काहींचा उत्तर गोव्यात करण्यात आला आहे. त्यामुळेच पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने पर्यावरणीय दाखले देण्यास नकार दर्शवला आहे. झोनचे जिल्हे निश्चित करून सर्व्हेक्षण अहवाल नव्याने सादर करण्याचे आदेश प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्याकडून हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पारंपरिक रेती उपशासाठी पर्यावरणीय दाखले मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पारंपरिक रेती उपशासाठी खाण खात्याने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे. त्यातच झोन गोंधळामुळे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने पर्यावरणीय दाखले देण्यास नकार दिल्याने ही प्रक्रिया पुन्हा रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर सर्व्हेक्षण अहवाल प्राधिकरणाला देण्याबाबत राज्य सरकारने पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रेती उपशासाठी निश्चित केलेल्या चौदाही झोनची पाहणी झाल्यानंतरच पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने रेती उपशासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर खाण खात्याने या चौदा झोनमधून पारंपरिक आणि अपारंपरिकरीत्या रेती उपसा करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. रेती उपसा बंद असल्याने इतर राज्यांतून गोव्यात येत असलेल्या रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनता राज्यातील रेती उपसा कधी सुरू होणार, याकडे डोळे लावून आहे.