‘दयानंद सामाजिक’च्या ८० वर्षांवरील लाभार्थ्यांचा सर्व्हे सुरू

२० दिवसांत ५०० जणांचा लाभ बंद : पत्त्यावर राहत नसलेल्यांचा लाभ होणार स्थगित


23rd November, 12:14 am
‘दयानंद सामाजिक’च्या ८० वर्षांवरील लाभार्थ्यांचा सर्व्हे सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : समाजकल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा (डीएसएसवाय) लाभ हयात नसलेल्या वृद्धांची कुटुंबे घेत असल्याचे समोर आल्याने खात्याने ८० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींचा सर्व्हे सुरू केला आहे. या सर्व्हे दरम्यान गेल्या २० दिवसांत ५०० पेक्षा मृत व्यक्तींच्या नावावर योजनेचा लाभ जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. यापुढे मृत लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेत असताना दिलेल्या पत्त्यावर लाभार्थी राहत नसल्यास त्याचा पत्ता निश्चित होईपर्यंत त्याच्यासाठी योजना स्थगित ठेवण्यात येणार आहे.
खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी शनिवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना याबाबतची माहिती​ दिली. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींना अर्थसाहाय्य करण्यासाठी २००१ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने ‘डीएसएसवाय’ सुरू केली. योजनेअंतर्गत सध्या राज्यातील ६० वर्षांवरील लाखो वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला सुमारे ३० कोटी रुपये वितरित केले जातात. योजना सुरू झाल्यानंतरच्या वर्षांत त्यांतील अनेकांचा मृत्यू झाला आहे. तरीही त्यांच्या बँक खात्यांत योजनेचा लाभ जात असल्याचे समोर आले. सरकारचा हा वाया जात असलेला पैसा रोखण्यासाठी खात्याने पहिल्या टप्प्यात ८० वर्षांवरील व्यक्तींचा घरोघरी जाऊन सर्व्हे सुरू केला आहे. मृत पावलेले पण, योजनेचा लाभ मिळत असलेले ५०० पेक्षा अधिक जणांची नोंद गेल्या २० दिवसांमध्ये झालेली आहे, असे पंचवाडकर म्हणाले.
पहिल्या टप्प्यात ८० वर्षांवरील, दुसऱ्या टप्प्यात ७५ ते ८० वर्षे वयोगट, तिसऱ्या टप्प्यात ७० ते ७५ वर्षे वयोगट, चौथ्या टप्प्यात ६५ ते ७० वर्षे वयोगट आणि पाचव्या टप्प्यात ६० ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा सर्व्हे केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘डीएसएसवाय’ योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थींनी गोव्यात राहणे आवश्यक आहे. तरीही काही लाभार्थी गोव्याबाहेर जाऊन राहत आहेत. तर काहीजण दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे सर्व्हे दरम्यान आढळून आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थींचा नेमका पत्ता स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्यांना मिळणारा लाभ स्थगित ठेवण्याचा निर्णय खात्याने घेतला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बँक खात्यांत जमा झालेली रक्कम परत घेणार !
योजनेचा लाभ मिळत असलेल्या ज्या व्यक्ती मृत पावलेल्या आहेत, त्यांचा लाभ बंद झाल्यानंतर योजनेअंतर्गत खर्च होणाऱ्या पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याशिवाय अशा व्यक्तींच्या बँक खात्यांत योजनेअंतर्गत जमा झालेले पैसेही परत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे योजनेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल, असेही संचालक अजित पंचवाडकर यांनी स्पष्ट केले. समाजकल्याण खात्याने सुरू केलेल्या सर्व्हेला ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही​ त्यांनी केले.