शाळेत मुलीला मारहाण; शिक्षण खात्याकडून स्वेच्छा दखल

कुंकळ्ळीतील घटनेची पोलीस चौकशी सुरू


3 hours ago
शाळेत मुलीला मारहाण; शिक्षण खात्याकडून स्वेच्छा दखल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कुंकळ्ळी भागातील शाळेत मुलीला झालेल्या मारहाणीची शिक्षण खात्याने स्वेच्छा दखल घेतली आहे. तिसरीतील मुलीला मारहाण झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली आहे. खात्याकडे कुणीही तक्रार केलेली नाही. संबंधित शाळेकडून यासंदर्भात अहवाल मागवून चौकशी केली जाईल, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
तिसरीतील मुलीला शाळेतच दुखापत झाली; पण वेळेत उपचारासाठी नेले नाही, असा दावा पालकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याची दखल आता शिक्षण खात्यानेही घेतली आहे. शाळेत दोन तासांच्या मधील काही मिनिटांच्या वेळेत मुलांमध्ये मस्ती सुरू होती. यातच एका मुलीला मार बसला. पालकांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनाने मुलीने तक्रार केल्यानंतर लक्ष दिले पाहिजे होते; पण ती रडत असतानाही कोणी लक्ष दिले नाही. वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक होते. तिच्या आईने शाळेतून तिला वैयक्तिक गाडीतून बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सिटीस्कॅन केल्यावर रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे दिसून आले. गोमेकॉत तिच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. सध्या मुलीची तब्येत सुधारत आहे. आपल्या मुलीसोबत झाले, ते इतरांसोबत होऊ नये. यासाठी याची दखल सर्वांनी घेण्याची गरज आहे, असे पालकांनी सांगितले.
पोलिसांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलीच्या वर्गातील मुलांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. संस्थेकडूनही माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी शिक्षण खात्याकडूनही चौकशी केली जाणार आहे.