काणकोणातील कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत संशोधन करा!

सभापतींची मागणी : गोवा कॅन्सर सोसायटीही आग्रही


3 hours ago
काणकोणातील कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत संशोधन करा!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : काणकोण तालुक्यात मूत्रपिंडाच्या आजारानंतर कर्करुग्ण वाढत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या आजाराविषयी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. मी यापूर्वीही अशी मागणी केली होती, आता पुन्हा करत आहे, असे सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कॅन्सर स्क्रिनिंग मोहिमेअंतर्गत शनिवारी गोमेकॉची मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन काणकोण तालुक्यात पोहोचली. या मोहिमेत ९० पुरुष आणि १९६ महिलांची तपासणी करण्यात आली. यांपैकी एकाला तोंडाचा दुसऱ्यांदा कर्करोग झाल्याचे, तर १२ जण कर्करोग होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, असे तपासणीनंतर स्पष्ट झाले.
काणकोणातील या स्थितीविषयी सभापती रमेश तवडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुक्यात आता कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. याविषयी संशोधन करण्याची मागणी मी यापूूर्वीच केली आहे. आता पुन्हा ही मागणी करत आहे. कर्करुग्ण फक्त काणकोणातच वाढत आहेत, असे म्हणता येणार नाही. राज्यात तपासणी झालेल्या ठिकाणीही कर्करुग्ण आढळले आहेत. भाज्या, फळे पिकवण्यासाठी होणारा रसायनांचा वापर आणि बदललेली जीवनपद्धती यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढली आहे, असेही सभापती यावेळी म्हणाले.

पूर्ण राज्यातच कर्करुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातच याबाबतचे संशोधन होणे गरजेचे आहे, असे गोवा कॅन्सर सोसायटीचे संयुक्त सचिव डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.