कुंकळ्ळीत मुस्लिम युवकाला मारहाण; हिंदूंची धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार

दोन्ही गट पोलीस ठाण्यात समोरासमोर आल्याने वातावरण तणावपूर्ण


3 hours ago
कुंकळ्ळीत मुस्लिम युवकाला मारहाण; हिंदूंची धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार

पोलीस ठाण्याबाहेर जमलेले दोन्ही गटांचे कार्यकर्ते.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : जुलूसवेळी मुस्लिम युवकाने भावना दुखावल्याच्या वादातून तिघा युवकांनी मुस्लिम युवकाला रविवारी दुपारी मारहाण केली. यावरून मुस्लिम बांधव पोलीस ठाण्यात आले, त्यानंतर हिंदू गट पोलीस ठाण्यावर आला. त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे पोलिसांना सांगितले. कुंकळ्ळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारी नोंद करून कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रविवारी सायंकाळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हिंदू संघटनांनी राज्यातील जुलूसला विरोध दर्शवला होता. तसाच विरोध कुंकळ्ळीतही झाला. यानंतरही कुंकळ्ळीत जुलूस काढण्यात आला होता. त्यावेळी काही बजरंग दलाच्या युवकांशी त्याचा वाद झाला होता. त्याच वादातून हा मारहाणीचा प्रकार घडला. मुस्लिम बांधवांनी केलेल्या आरोपानुसार, दुपारी तिघा हिंदू युवकांनी मुस्लिम युवकाला मारहाण केली. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली व मुस्लिम बांधवांनी जमाव करत सायंकाळी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात जाऊन मारहाण करणार्‍यांना अटक करण्याची मागणी केली.
कायद्यानुसार कारवाईचे पोलिसांचे आश्वासन
त्यानंतर हिंदू गटाकडूनही मारहाण झालेल्या युवकाने धमकावल्याची, तसेच देवीसंदर्भात चुकीची भाषा वापरत धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली. दोन्ही गट कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या परिसरात आमनेसामने आल्यानंतर तणावाचे वातावरण झाले. तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी दोन्ही गटांना घटनास्थळावरून जाण्यास सांगितले. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी संतोष देसाई यांनी दिले. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.