६ लाख चौ.मी. क्षेत्रात दिल्लीचे १,१३४ कोटींचे प्रकल्प

भुतानी, डीएलएफ, लोढा रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश

Story: समीप नार्वेकर |
3 hours ago
६ लाख चौ.मी. क्षेत्रात दिल्लीचे १,१३४ कोटींचे प्रकल्प

गोवन वार्ता
पणजी : दिल्लीतील सुप्रसिद्ध भुतानी, डीएलएफ आणि लोढा या रिअल इस्टेट कंपन्यांचे गोव्यात ६.४० लाख चौ.मी. क्षेत्रात १,१३४ कोटी रुपयांचे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांसाठी मंजुरी मिळाली आहे; परंतु स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे या प्रकल्पांचे काम लांबण्याची शक्यता आहे.भुतानीचा एक आणि लोढाच्या तीनपैकी एक प्रकल्प सांकवाळ येथे येणार आहे. लोढाचे उर्वरित दोन प्रकल्प कारापूर डिचोली येथे येत आहेत. डीएलएफचा एक प्रकल्प रेईश मागूस येथे येणार आहे. लोढा कंपनीचा सर्वांत मोठा प्रकल्प डिचोलीतील वन गोवा येथे २ लाख चौ.मी. क्षेत्रात येणार आहे. त्या खालोखाल डीएलएफचा क्रमांक लागतो. त्यांचा प्रकल्प १ लाख चौ.मी. क्षेत्राची जागा व्यापणार आहे. सांकवाळ येथे वादग्रस्त भुतानी प्रकल्पाबरोबरच लोढाचा गल्फ ऑफ गोवा हा प्रकल्प येणार आहे.
सांकवाळ येथील वादग्रस्त ठरलेला भुतानी अॅक्वा इडेन हा प्रकल्प ३५,०५० चौ.मी. क्षेत्रात उभारला जात आहे. यासाठी ४३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात ७,६८८ चौ.मी. क्षेत्रात ३० व्हीला (बंगले), तर २९,९०२ चौ.मी. क्षेत्रात ६६० फ्लॅट उभारले जाणार आहेत. १० फेब्रुवारी २०२४ रोजी मंजुरी मिळालेला हा प्रकल्प ३१ डिसेंबर २०२८ रोजी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या होत असलेला विरोध पहाता या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आहे.
डीएलएफचा दि बे व्ह्यू
मांडवी नदी किनारी रेईश मागूस येथे दिल्ली लँड अँड फायनान्स (डीएलएफ) यांचा दि बे व्ह्यू हा प्रकल्प १ लाख ६ हजार ३४६ चौ.मी. क्षेत्रात ४४३ कोटी खर्चून उभारला जाणार आहे. या प्रकल्पात २,२८३ चौ.मी. क्षेत्रात ८४ व्हिला (बंगले) येणार आहेत. डीएलएफने भागातील डोंगर कापणीचे काम सुरू केल्याने याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम ३३ टक्के पूर्ण झाले आहे.

लोढा- वन गोवा भाग १ आणि २
डिचोलीतील कारापूर भागात हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांचे वन गोवा भाग १ हा प्रकल्प १ लाख १८ हजार १२९ चौ.मी. क्षेत्रात येणार आहे. २११ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ६२५ फ्लॅट येणार आहेत. या प्रकल्पाच्या शेजारीच २,१४,४९६ चौ.मी. क्षेत्रात या कंपनीचा भाग २ प्रकल्प येत आहे. या प्रकल्पाचा खर्च १९९ कोटी रुपये आहे. या प्रकल्पान १,१५,१४३ चौ.मी. क्षेत्रात ७५८ फ्लॅट येणार आहेत. पैकी १५७ फ्लॅट विकले आहेत.
लोढा - गल्फ ऑफ गोवा
सांकवाळमधील भुतानी प्रकल्पाच्या थोड्यात अंतरावर समुद्र किनारी ९६,७०९ चौ.मी. क्षेत्रात २३५ कोटींचा हा प्रकल्प येत आहे. या प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे ४० टक्के काम झाले आहे.