गोवा डेअरीकडून दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा​

पराग नगर्सेकर : डेअरीला २ कोटी ४० लाखांचा फायदा


29th September, 11:52 pm
गोवा डेअरीकडून दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा​

पत्रकारांना माहिती देताना अध्यक्ष पराग नगर्सेकर. सोबत इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मागील वर्षी गोवा डेअरीला २ कोटी ४० लाख रुपयांचा नफा झाला आहे. दूध उत्पादकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुर्टी येथील सहकार भवन सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला रामा परब, संदीप पार्सेकर, सहकार खात्याचे सहनिबंधक सतीश सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्वसाधारण सभा झाल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना अध्यक्ष पराग नगर्सेकर म्हणाले की, मागील वर्षात गोवा डेअरीला २ कोटी ४० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दूध उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय डेेअरीकडून घेण्यात आला आहे. दूध उत्पादकांच्या मागणीनुसार सभेचे रिकॉर्डिंग करण्यात आले आहे. राज्यातील दूध उत्पादकांना प्रत्येक दिवशी मोबाईलवरून संदेश पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना रोज दूधासंबधी आवश्यक माहिती मिळू लागली आहे.
संचालक मंडळाची लवकर निवडणूक घेण्याची मागणी
दरम्यान, रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला राज्यातील विविध भागांतील दूध उत्पादन संघांचे प्रतिनिधी कमी प्रमाणात उपस्थित होते. गोवा डेअरीमध्ये लवकर संचालक मंडळाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी दूध उत्पादन संघांच्या काही प्रतिनिधींनी सभेत केली.
दररोज ४० हजार लिटर दुधाचे संकलन !
गोवा डेअरीचा उसगाव येथे पशुखाद्य प्रकल्प आहे. याबाबत पशुसंवर्धन खात्याकडून अद्याप काहीच उत्तर देण्यात आलेले नाही. गोवा डेअरीने नियुक्त केलेल्या हिशोब तपासनीसांनी शेरा मारल्याने पुढील त्रुटी दुरुस्त करण्यात येत आहेत. सध्या राज्यभरातून दररोज ४० हजार लिटर दुधाचे संकलन डेअरीकडून करण्यात येत आहे. दूध विक्री दरात वाढ करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष पराग नगर्सेकर यांनी स्पष्ट केले.