शेळपे, मलपण येथे बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांचा छापा

२५ लाखांची मशीनरी जप्त : मालकावर गुन्हा दाखल करणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 11:46 pm
शेळपे, मलपण येथे बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांचा छापा

वाळपई : खोतोडा पंचायत क्षेत्रातील शेळपे व मलपण येथील बेकायदेशीर चिरेखाणींवर वाळपई पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मशिनरी जप्त केली आहे. चिरेखाणीवर वापरण्यात येणारे कटर, जनरेटर, जेसीबी मशीन अशी सुमारे लाखो रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वाळपई पोलिसांनी आज संध्याकाळी शेळपे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशी चिरेखाणीवर व धाड घातली. यावेळी सदर ठिकाणी चिरेखाणीचे काम सुरू होते. छापा घालताच कामगारांनी पळापळ सुरू केली. पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. येथील खाणीला कायदेशीर परवाना नसताना खाण बिनधास्तपणे सुरू होती. वाळपई पोलिसांनी सुमारे २५ लाख रुपयांची मशिनरी व इतर सामान जप्त केले.

खोतोडा पंचायत क्षेत्रातील मलपण या ठिकाणी सुद्धा वाळपई पोलिसांनी छापा टाकून जेसीबी मशीन, जनरेटर, चिरे कापण्याचे सामान जप्त केले. येथे सुमारे पंधरा लाखांची मशिनरी जप्त करण्यात आली.

छापा टाकताना चिरे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. यापूर्वी सुद्धा सदर बेकायदेशीर चिरेखाणीवर खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली होती. यानंतर पुन्हा बेकायदेशीर खाण सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, वाळपई पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बेकायदेशीर खाणींच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बेकायदेशीर चिरेखाणी सुरू असून खाण खात्याच्या अधिकाऱ्याकडून याबाबत होणारे दुर्लक्ष याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

६ महिने चिरेखाण सुरू असूनही डोळेझाक

शेळपे येथे एका व्यक्तीकडून हा व्यवसाय सुरू आहे. या चिरेखाणीवर अजूनपर्यंत कोणीही छापा टाकलेला नाही. खाण खात्याचे अधिकारी सुद्धा सहा मशिने येथे बेकादेशीरपणे चिरेखाण सुरू असूनही फिरकले नाहीत. चिरेखाण मालकावर अजूनपर्यंत कारवाई करण्यात न आल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

हेही वाचा