राजकीय पाठबळ नसतानाही ५० टक्के बस सवलत आंदोलन यशस्वी!

मोहनदास लोलयेकर : १९७० ते ८० च्या दशकातील विद्यार्थी चळवळीतील आठवणींना उजाळा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 11:38 pm
राजकीय पाठबळ नसतानाही ५० टक्के बस सवलत आंदोलन यशस्वी!

गोव्याच्या विद्यार्थी चळवळीसंबंधीच्या कथामालेत मोहनदास लोलयेकर याची मुलाखत घेताना संकल्प गावकर. (संजय कोमरपंत)

काणकोण : १९७० ते ८० च्या दशकातील विद्यार्थी चळवळ व ५० टक्के बस सवलत आंदोलन कोणत्याच राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय यशस्वी होऊ शकले. तेव्हाचे सरकार संवेदनशील होते. खासगी बस लॉबी स्ट्रॉंग होती. आजच्या सरकारवर टीका केल्यास सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री ती टीका वैयक्तिक घेतात व सूड उगवायला पाहतात. त्याकाळी ५० टक्के बस तिकीट सवलत मिळविणारे गोवा हे एकमेव राज्य होते, असे मोहनदास लोलयेकर यांनी सांगितले.
लोलये येथील मनोशोभा कलाघरात आयोजित केलेला ‘गांठवळ’ या विद्यार्थी चळवळीच्या इतिहास मालेचा शुभारंभ केल्यानंतर संकल्प गावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत विद्यार्थी चळवळीचे नेते मोहनदास लोलयेकर बोलत होते.
त्यावेळचे जास्तीत जास्त विद्यार्थी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. त्यांना बस तिकीट परवडत नव्हते. त्यावेळी अख्ख्या गोव्यात सहा ते सात महाविद्यालये होती. खाजगी बस मालक ५० टक्के बस तिकीट सवलत देत नव्हते. तेव्हा विद्यार्थ्यांनाच कायदा हातात घ्यावा लागला. सरकारची २५ टक्के बस तिकीट सवलत सुरू होती, मात्र विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच ५० टक्के सवलत मिळू शकली. आज सुद्धा ५० टक्के बस तिकीट सवलत आहे व आजही बस टिकीट सवलत देताना खासगी बस चालक १९७० ते ८० च्या दशकासारखी कुरकुर व किटकिट करीत असतात. मात्र आजचे विद्यार्थी सर्व काही सहन करीत आहेत. त्यांचे रक्त सळसळत नाही. त्यांना चिड येत नाही, ही शोकांतिका आहे, असे श्री लोलयेकर म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत अविनाश भोसले, अमोल नावेलकर, दिलीप बोरकर, गार्गी सातोस्कर, डॉ. वेरेकर, प्रशांत नाईक, प्रशांती तळपणकर, रोहिदास गावकर, प्रभव नायक, संजय कोमरपंत व इतरानी भाग घेतला. या कार्यक्रमाला अॅड. क्लिओफात कुतिन्हो, जीवन मयेकर, सुशीला मेंडिस, सतीश पैंगीणकर, तियोतिनो डिकोस्टा, सुकुर फर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक मनोहर व शोभा प्रभुदेसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. उद्योजक दत्ता नायक यांच्या हस्ते संकल्प गावकर व मोहनदास लोलेकर यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश प्रभुदेसाई यांनी केले.

विविध पुस्तकांतून मिळाली प्रेरणा

आजच्या पालकांना आपले पाल्य ऑलराऊंडर व्हावे असे वाटते. त्याकाळी आजच्यासारखा विद्यार्थ्यांवर पालकाचा दबाव नव्हता. विद्यार्थी स्वतः आपले करिअर घडवायचे. आंदोलन करताना सर्व विद्यार्थ्यांचा एकमेकांवर विश्वास होता. आम्हाला आंदोलन करताना कोणी गुरू नव्हता. विविध पुस्तकांनी आम्हाला प्रेरणा दिली, असेही श्री लोलयेकर यांनी सांगितले.

....