नाल्यावर विजेचा खांब आडवा टाकून केला पदपूल

पाचमे-खांडेपार येथील रहिवाशांची कसरत : विद्यार्थी जीव धोक्यात घालून करतात ये-जा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 11:31 pm
नाल्यावर विजेचा खांब आडवा टाकून केला पदपूल

पाचमे-खांडेपार येथे नाल्यावर घातलेल्या वीज खांबावरून जाताना विद्यार्थी.      

फोंडा : खांडेपार पंचायत क्षेत्रातील पाचमे गावातील विध्यार्थ्यांना हायस्कूल गाठण्यासाठी नाल्यावर असलेल्या वीज खांबाचा आधार घ्यावा लागत आहे. रोज हायस्कूलमध्ये ये-जा करण्यासाठी नाल्यावर घातलेल्या वीज खांबाचा पदपूलासारखा वापर करावा लागत आहे. कित्येक वर्षांपासून नाल्यावर साकव उभारण्याची मागणी सरकार दरबारी पडून आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्वरित आवश्यक उपाय करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
गावातील सुमारे २०-२२ मुले रोज जवळील हायस्कूलमध्ये याच नाल्यावर असलेल्या वीज खांबावरून ये - जा करीत असतात. त्यामुळे मुलाचे पाय घसरून नाल्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावातील लोक सुद्धा याच नाल्यावर असलेल्या वीज खांबाचा वापर करतात. पावसाळ्यात नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. त्यामुळे पावसाळ्यात खांबावरून ये-जा करणे अधिक धोकादायक बनते. त्यामुळे स्थानिकांनी वारंवार नाल्यावर लहान साकव उभारण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष केले आहे.
पाचमे गावात सुमारे ३५-४० घरे आहे. गावात जाण्यासाठी लोकांना जंगल भागातून रस्ता आहे. पण नाल्यावरून गेल्यास हायस्कूलमध्ये लवकर पोहचता येत असल्याने गावातील मुले हाच मार्ग पत्करतात. त्याशिवाय गावातील लोक सुद्धा याच नाल्यावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे त्या नाल्यावर साकाव उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

गावातील २० मुले धोका पत्करून नाल्यावर असलेल्या वीज खांबावरून हायस्कूल गाठतात. पावसाळ्यात वीज खांबावरून ये - जा करताना पाय घसरून नाल्यात कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे या ठिकाणी साकव उभारण्याची मागणी पालक गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहे. सरकारने गांभीर्य ओळखून त्वरित दखल घेण्याची गरज आहे.
संतोष सतरकर, पालक


नाल्यावरून धोकादायक स्थितीत मुले ये - जा करीत असल्याची दखल पंचायतीने घेतली आहे. जलस्रोत खात्यामार्फत साकव उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासंबंधीची फाईल मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.
हरीश नाईक, सरपंच, कुर्टी- खांडेपार पंचायत