सीडी साळगावकरकडून चर्चिल ब्रदर्सचा १-०ने पराभव

गोवा प्रोफेशनल फुटबॉल लीग : मेव्हझेन ऑलिव्हेराचा एकमेव गोल

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 09:50 pm
सीडी साळगावकरकडून चर्चिल ब्रदर्सचा १-०ने पराभव

पणजी : गोवा प्रोफेशनल फुटबॉल लीगमध्ये सीडी साळगावकरने मेव्हझेन ऑलिव्हेराच्या गोलच्या जोरावर चर्चील ब्रदर्स संघाचा १-० असा पराभव केला. दरम्यान अखेरच्या काही मिनिटांच्या लढतीत साळगावकरचा कर्णधार प्रतेश शिरोडकर याला रेडकार्ड दाखवण्यात आले.

दोन्ही संघांनी अंतिम अकरामध्ये केले बदल

अखेरच्या सामन्यात बरोबरीत समाधान मानणाऱ्या साळगावकरने या सामन्यासाठी आपल्या संघात काही बदल केले. प्रशिक्षक किनन यांनी तिपान्नाला बचावात पुन्हा आणले तर प्रतेशला आघाडीमध्ये उभे केले. दरम्यान चर्चिलनेही आपल्या संघात बदल करताना गोलरक्षक नितीश मेहरा, बचावपटू मेकेंझी आणि जॉली सिंग यांना अंतिम अकरामध्ये स्थान दिले.

सामन्याच्या सुरुवापासूनच साळगावकर संघ अॅक्शन मोडमध्ये आला व चर्चिलच्या मेहरा व त्याच्या बचावात झालेल्या गोंधळाचा फायदा घेतला. गोल करण्यासाठी साळगावकरला जास्त वेळ थांबावे लागले नाही व केवळ दुसऱ्याच मिनिटाला मेव्हझेन ऑलिव्हेराने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

साळगावकरला ९व्या मिनिटाला आपल्या गोलांची आघाडी दुप्पट करण्याची संधी होती. मात्र स्ट्रायकर बोईनाओ सिंगने मारलेला फटका मेहराने अडवला. ३२व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधण्याची संधी प्राप्त झाली. बचावात झालेल्या चुकीमुळे लुन्मिनलेन हाओकिप गोल करण्याच्या जवळ आला व त्याला फक्त गोलरक्षकाला चकवायचे होते. परंतु त्याने मारलेला फटका थोडक्यात चुकला व सामना १-० असाच राहिला.