पणजी : तीन वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या होणार बदल्या!

यापुढे आपल्या कार्यक्षेत्रातच मुक्काम करण्याची निरीक्षकांना सक्ती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 04:22 pm
पणजी : तीन वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या होणार बदल्या!

पणजी : एकाच पोलीस स्थानकात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या पुढील तीन ते चार दिवसांत बदल्या होतील. याशिवाय निरीक्षकांना यापुढे आपल्या पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातच मुक्काम ठोकणे सक्तीचे राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील काही​ पोलीस स्थानकांत अनेक वर्षांपासून एकच निरीक्षक आहे. अशा सर्व निरीक्षकांच्या बदल्या होणार आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीच्या घटनांवर अंकूश ठेवण्यासाठी यापुढे निरीक्षकांना त्याच भागात निवास करावा लागेल. यापुढे निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच कॉन्स्टेबल या पदांवरील पोलिसांच्या सातत्याने विविध विभागांमध्ये बदल्या करण्यात येतील. याशिवाय राज्यातील २० टक्के पोलिसांना रात्रपाळीवर ठेवण्याचा निर्णय गृह खात्याच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देश-विदेशातील ड्रग्ज तस्कर वारंवार गोव्याला लक्ष्य करीत आहेत. त्यांच्यावर ड्रग्जविरोधी पथक तसेच क्राईम ब्रांच लक्ष ठेवून आहे. गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या काही जणांना गोव्यातून कायमचे हद्दपार करण्यात येईल. शिवाय कोणताही कर न भरता रस्त्याकडेला बसून व्यवसाय करणाऱ्यांनाही तेथून हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा