पणजी : अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना सशर्त जमीन मंजूर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
29th September, 11:58 am
पणजी : अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना सशर्त जमीन मंजूर

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) दोना पावला येथे छापा टाकून ५ लाख रुपये किमतीचा ५ किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणी जप्त केलेला गांजा हा किरकोळ स्वरूपाचा आहे. तसेच अटक केलेले संशयित नितेश सिंग आणि राजू सिंग हे परराज्यातील असल्यामुळे त्या दोघांना कोठडीत ठेवता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवून पणजी येथील अतिरिक्त सत्र न्या. बॉस्को रॉबर्ट यांनी त्या दोघांना २५ हजार रुपये व इतर अटीवर जामीन मंजूर केला.

दोना पावला येथील जीटीडीसीच्या बाहेर असलेल्या पार्किंग परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी एएनसीच्या एका अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार, एएनसीच्या पथकाने वरील ठिकाणी १३ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ ते मध्यरात्री ०.१५ वा. सापळा रचला. त्यानंतर त्या ठिकाणी दोन युवक येऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथकाला दिसले.  गुप्तहेरांनी दिलेली माहिती तंतोतंत जुळत असल्यामुळे पथकाने त्या दोघांची चौकशी केली. त्यानुसार, पथकाने नितेश सिंग याची झडती घेतली असता, त्याच्याकडून एका बॅगेत असलेला ५ किलो गांजा जप्त केला. या गांजाचे बाजारमूल्य पाच लाख रुपये असून त्यासोबतच त्याच्याकडून १,५०० रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर राजू सिंग याची झडती घेतली असता, त्याच्याकडून काहीच सापडले नाही. मात्र ते दोघे बरोबर गोव्यात आल्यामुळे त्या दोघांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

त्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावली. याच दरम्यान दोघा युवकांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी त्यांच्यातर्फे अॅड. कौतुक रायकर यांनी बाजू मांडली. त्यानुसार, एका संशयिताकडून जप्त केलेल्या गांजा किरकोळ स्वरूपाचा आहे. तसेच ते दोघे गोवा बाहेरच्या असल्यामुळे न्यायालयाने अटी घालून जामीन देण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून दोघा संशयितांना २५ हजार रुपयाच्या व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

हेही वाचा