भुतानी प्रकल्पाशी माझा दुरान्वये संबंध नाही: गुदिन्हो

गणेशवाडी - उपासनगर येथे गुदिन्हो यांच्या हस्ते वॉकिंग ट्रॅकच्या कामाचा शुभारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 12:16 am
भुतानी प्रकल्पाशी माझा दुरान्वये संबंध नाही: गुदिन्हो

वास्को : भुतानी प्रकल्पामध्ये माझा दुरान्वये संबंध नसतानाही काहीजण माझे नाव घेतात. त्यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच येत नसावी, माझे नाव घेतल्याने त्यांना कदाचित समाधान वाटत असावे असा टोला पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो यांनी विरोधकांना लगावला.

गणेशवाडी - उपासनगर येथे मोकळ्या जागेत जिल्हा पंचायत निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या वॉकिंग ट्रॅकच्या कामाचा शुभारंभ मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, पंच संतोष देसाई, सामाजिक कार्यकर्ते एडी फर्नांडिस, पंच मोर्लिओ कार्वालो तसेच इतर मान्यवर तसेच गणेशवाडीचे रहिवासी उपस्थित होते.

या सरकारमध्ये कोणतीही समस्या सोडविण्याची क्षमता आहे. त्यामुळे सरकार योग्य ते निर्णय घेईल असे ते म्हणाले. वॉकिंग ट्रॅकचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत येथे मोठी कामे होत आहेत. तर भाजपा सरकारमुळे गोव्याचा सर्वांगीण विकास होत आहेत. अनिता थोरात यांनी वॉकिंग ट्रॅक झाल्यावर स्थानिकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक व्हावा अशी त्यांची मागणी होती. ती पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


येणाऱ्या काळात दाबोळी विमानतळ ते वेर्णा चौक दरम्यान उड्डाण पुल बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दाबोळी विमातळ ते क्वीनीनगर तर दुसऱ्या टप्प्यामध्ये क्वीनीनगर ते वेर्णा चौक असे उड्डाण पुलाचे काम होणार आहे. या उड्डाण पुलावरून अवजड वाहनांची ये-जा होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. - मॉवीन गुदिन्हो 

हेही वाचा