वाळपई पोलीसांकडून परप्रांतीय कामगारांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू

घर मालकांनी भाडेकरूंची माहिती देणे गरजेचे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 12:10 am
वाळपई पोलीसांकडून परप्रांतीय कामगारांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू

वाळपई: गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्या, खून, बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेऊन सत्तरी तालुक्यातील परप्रांतीय कामगारांच्या पडताळणी प्रक्रियेला वाळपई पोलीस स्थानकातर्फे शनिवार पासून सुरुवात करण्यात आली.

वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक विद्देश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पडताळणीची प्रक्रिया वाळपई शहरांमध्ये सुरू करण्यात आली.

सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. खास करून वाळपई शहर व ग्रामीण भागात बिहार, उत्तर प्रदेश ,झारखंड, कर्नाटक ओरीसा या भागातील कामगार असून संबंधित घरमालकाने त्यांचा बी फार्म भरून त्यांची सविस्तरपणे माहिती वाळपई पोलीस स्थानकाला देणे गरजेचे होते.

मात्र ही प्रक्रिया अजिबात होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कामगारांची माहिती लपवून ठेवणाऱ्या घरमालकांवरही कारवाई करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे समजते.

या संदर्भात माहिती देताना निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी सांगितले की सत्तरी तालुका त्याचप्रमाणे वाळपई व ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या कामगारांची माहिती पोलीस स्थानकाला असणे गरजेचे आहे. शनिवारी बहुतांशी कामगारांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया सातत्याने सुरू करण्यात येणार आहे. मात्र अनेक घरमालकांकडून आपल्या घरात भाडेपट्टीवर राहणाऱ्या कामगारांची माहिती देणे हे घरमालकांसाठी बंधनकारक असते.


बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता
वाळपई शहरामध्ये जवळपास एक वर्षांपूर्वी नगरपालिका क्षेत्रामध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले होते. तसेच सद्यस्थितीतही वाळपई शहरांमध्ये काही बांगलादेशी घुसखोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाळपई पोलीसांनी बांगलादेशी घुसखोरांचा तपास करावा अशा प्रकारची मागणी देश प्रेमी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे. 

हेही वाचा