नास्नोडकर ज्वेलर्स चोरी प्रकरणी संशयितांचा कसून तपास

प्रकरणातील दोघा अल्पवयीनांची रवानगी मेरशीतील सुधारगृहात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th September, 12:08 am
नास्नोडकर ज्वेलर्स चोरी प्रकरणी संशयितांचा कसून तपास

म्हापसा : येथील बाजारपेठेतील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीच्या नास्नोडकर ज्वेलर्स या दुकानातील चोरी प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयितांना १० दिवसांची पोलीस कोठडी म्हापसा न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात संशयितांसोबत आणखी काही साथीदार होते का याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

म्हापसा पोलिसांनी कुडाळ, महाराष्ट्र येथील रेल्वे स्थानकावर आणि अजमेर राजस्थान येथून संशयित आरोपी हरजी पूनमसिंग चौहाण (२६, कृष्णापुरा, राजस्थान) व भवानी हिरा सिंग (१८, रा. कृष्णापुरा राजस्थान) या दोघांसह दोन १६ व १७ वर्षीय अल्पवयीन युवकांना पकडून अटक केली होती. शुक्रवारी २७ रोजी संशयितांना गोव्यात आणल्यानंतर वरील दोन्ही अल्पवयीनांची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आली. तर अटक केलेल्या दोघाही संशयितांना संशयितांना म्हापसा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित आरोपींसमवेत या चोरी प्रकरणात अजून काहीजण असण्याची संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार संशयितांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. संशयित टोळीने ही पहिलीच चोरी केलेली आहे. त्यामुळे या चोरी मागे त्यांचा कोणता इरादा होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांची समयसूचकता
संशयित टोळीने ही चोरी केल्यानंतर त्यातील दोघे महारूद्र देवस्थानकडे आले होते. गस्तीवर असताना पोलिसांना ते सापडले होते.

पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी 'आम्ही गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत आहोत', असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना बस स्थानकावर जाण्यास सांगून पोलीस उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर यांनी समयसूचकता दाखवत त्यांचा फोटो घेतला होता.

फोटोमुळे तपासाला गती
पोलीस उपनिरीक्षकांनी ज्या अल्पवयीन संशयितांचा फोटो काढला होता त्या फोटोतील मुलाच्या अंगावरील व चोरीची घटना घडलेल्या नास्नोडकर ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदीस्त झालेल्या संशयितांच्या अंगावरील कपडे सारखेच असल्याचे दिसून आले.

पोलिसांना हेच दोघे या चोरीतील संशयित आहेत, याची खात्री झाल्यावर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. या चोरीतील संशयित हरजी चौहाण हा यापूर्वी होंडा-सत्तरी मधील एका रेस्टॉरन्टमध्ये कामाला होता.      

हेही वाचा