सदस्यता नोंदणीसाठी युवा काँग्रेसची ‘चलो पंचायत, चलो वॉर्ड’ मोहीम

२ ऑक्टोबरपासून मोहीम सुरू; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:59 pm
सदस्यता नोंदणीसाठी युवा काँग्रेसची ‘चलो पंचायत, चलो वॉर्ड’ मोहीम

पणजी : प्रदेश काँग्रेसची सदस्यता नोंदणी मोहीम येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या अनुषंगाने युवा काँग्रेसने राबवलेल्या ‘चलो पंचायत, चलो वॉर्ड’ मोहिमेअंतर्गत राज्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने युवा काँग्रेसचे सदस्यत्व घेऊन युवा काँग्रेसचे हात बळकट करावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

शनिवारी पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अ​ध्यक्ष कृष्णा आलावरू, प्रदेश युवा काँग्रेसच्या रिची भार्गवा, युवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्योएल आंद्रादे आ​णि महेश गावकर उपस्थित होते. राज्यातील युवकांसमोर सध्या बेरोजगारीसह अनेक विषय उभे आहेत. डॉ. प्रमोद सावंत सरकारने बेरोजगारीत गोव्याला देशात पहिल्यास्थानी नेऊन ठेवले आहे. त्यामुळे राज्यातील युवक-युवतींनी येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यता मोहिमेत सहभागी होऊन युवा काँग्रेसचे सदस्य मिळवावे. राज्यातील युवकांचे सर्व प्रश्न सोडवण्यास युवा काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही पाटकर यांनी नमूद केले.

सदस्यता नोंदणीसाठी युवा काँग्रेसतर्फे गोव्यात ‘चलो पंचायत, चलो वॉर्ड’ मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींना सदस्यता घेता येणार असल्याची माहिती आलावरू यांनी दिली.

पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेऊन नेतृत्व बदलू!

युवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्योएल आंद्रादे आपल्या पदाला न्याय देत नाहीत. पूर्वीप्रमाणे युवा काँग्रेसकडून विविध विषयांवरून आंदोलने, मोर्चे काढले जात नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील युवा काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याचा विचार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, आम्ही युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या सूचना घेऊ. त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, असे कृष्णा आलावरू यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा