कानपूर येथे दुसऱ्या दिवशी पावसाची ‘बॅटिंग’

आजही पाऊस शक्य : सामना ड्रॉ झाल्यास डब्ल्यूटीसी गुणतालिकेवर होणार परिणाम

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th September, 11:59 pm
कानपूर येथे दुसऱ्या दिवशी पावसाची ‘बॅटिंग’

कानपूर : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून कानपूरमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. अशा स्थितीत पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांशी बोलून दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. रविवार, २९ सप्टेंबर रोजीही येथे पावसाची ५९ टक्के शक्यता आहे.
शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसामुळे लवकर सामना संपविण्यात आला होता. केवळ ३५ षटके खेळता आली. साधारणपणे एका दिवसात ९० षटके टाकली जातात. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने ३ गडी गमावून १०७ धावा केल्या होत्या. मोमिनुल हक ४० आणि मुशफिकर रहीम ६ धावा करून नाबाद माघारी परतले.
२ सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. ग्रीन पार्क स्टेडियमवर टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो ३१ धावा करून बाद झाला. त्याला रविचंद्रन अश्विनने एलबीडब्ल्यू केले. त्याने शांतो आणि मोमिनुलची पन्नासची भागीदारी तोडली. तत्पूर्वी आकाश दीपने शादमान इस्लाम (२४ धावा) आणि झाकीर हसन (०) यांना बाद केले.
जवळपास नऊ वर्षांनी भारतीय मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात संपूर्ण दिवस एकही चेंडू न टाकता खेळ थांबल्याचे पाहायला मिळाले. याआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना बंगळुरुच्या मैदानात संपूर्ण दिवस वाया गेल्याचे पाहायला मिळाले होते. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दुसऱ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळच होऊ शकला नव्हता. भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका त्यावेळी भारतीय संघाने २-० अशी जिंकली होती. पण बंगळुरुच्या मैदानातील तो सामना मात्र अनिर्णित राहिला होता. त्यामुळेच याआधी बंगळुरुच्या मैदानात जे घडले ते कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडल तर ते टीम इंडियासाठीच तोट्याचे ठरेल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने बांगलादेश संघापेक्षा भारतीय संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आता उर्वरित ३ दिवसांत वातावरण बदलणार का? सामना झाला तर तो निकाली लागणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल हा साडे तीन दिवसांतच लागला होता. त्यामुळे जर उर्वरित तीन दिवसांचा खेळ नियोजित वेळेनुसार झाला तर भारतीय संघ उरलेल्या दिवसांतही कानपूरचे मैदान गाजवू शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं चेन्नई कसोटी सामना २८० धावांनी जिंकला होता. या सामन्यात रविचंद्रन अश्विननं अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यानं भारताच्या पहिल्या डावात शतक ठोकून संघाला अडचणीतून बाहेर काढलं. त्यानंतर गोलंदाजीत दुसऱ्या डावात ५ विकेट घेऊन भारताला विजय मिळवून दिला.भारतासाठी दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी शानदार शतक ठोकले होते. दुसऱ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचे ७१.६७ टक्के गुण आहेत. तर बांगलादेशचा संघ ३९.२९ टक्के गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर त्याचा फायदा भारतापेक्षा जास्त बांगलादेशला होईल.
वास्तविक, भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. कानपूर कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारताला बांगलादेश सोबत गुण वाटून घ्यावे लागतील. कसोटी सामना ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना ४-४ गुण मिळतात, तर विजेत्या संघाला १२ गुण मिळतात. जर हा सामना ड्रॉ झाला, तर भारताच्या खात्यात ६८.१८ टक्के गुण होतील. परंतु जर भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर भारताचे ७४.२४ टक्के गुण होतील. अशा परिस्थितीत ड्रॉ मुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान होऊ शकते.
कानपूर कसोटी ड्रॉ झाली तर बांगलादेशचे ३८.५४ टक्के गुण होतील. जर बांगलादेशचा विजय झाला, तर त्यांचे ४६.८७ टक्के गुण होतील. अशा परिस्थितीत ते टॉप ४ मध्ये आपली जागा निश्चित करतील. मात्र याची शक्यता फार कमी आहे.
भारताचेच नुकसान अधिक
कानपूर कसोटी ड्रॉ झाल्यास भारताचे जास्त नुकसान होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला आणखी ८ कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताला त्यापैकी कमीत कमी ५ सामने जिंकावे लागतील. भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मैदानावर ५ सामन्यांची मालिका खेळायची आहे.