साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

व्हायरल व्हिडीओचे राजकारण, कारवार खुनाचे गूढ कायम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:23 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे व्हायरल व्हिडीओ प्रकरण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांवर मुख्यमंत्र्यांनी चालविलेला चाबूक आणि कारवार गूढ हत्या प्रकरणाने हा आठवडा गाजला. याशिवाय आठवडाभर चोरांनी घातलेला धुमाकूळ आणि पावसाने सर्वांना हैराण करून सोडले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.


मुख्यमंत्र्यांचा व्हायरल व्हिडीओचे प्रकरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सरकारची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांनी आपले मौन सोडले. मला बदनाम करण्यासाठी काही राजकीय शक्ती खोट्या माहितीचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. काही लोकांची जमीन हडप प्रकरणांमध्ये दलाली बंद झाली आहे. कमिशन न मिळाल्याने आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कारवाया सुरूच राहतील. या व्हिडीओंना लोकांनी बळी पडू नये आणि डबल इंजिन सरकारवर पूर्ण विश्वास ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. सरकारमधील मंत्र्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. सावंत यांचा कारभार पारदर्शक असून संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्या पाठीशी असल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर आणि रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या व्हायरल व्हिडिओंचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.


चोरांचा धुमाकूळ

या आठवड्यात चोरांनी एटीएम आणि सोन्याचे दुकान फोडून खळबळ माजवली. हडफडे येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरांनी आतील साडेचार लाख रुपये चोरून नेले. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हणजुणे पोलिसांना रुस्तम उर्फ ​​सुहाग अब्दुल हक (मूळ बांगलादेश) आणि मिजानूर हुसेन मुल्ला (पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात यश आले. तपासादरम्यान त्यांची दहा जणांची टोळी असून त्यांनी गोव्यातील सात एटीएम फोडून १.०५ कोटी रुपयांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. जामीन मिळाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चोर एटीएमवर डल्ला मारायचे. तिसऱ्या दिवशी तीन बुरखाधारी चोरांनी म्हापसा बाजारातील नास्नोडकर ज्वेलर्स फोडून सुमारे एक कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रात्री १२ ते २ च्या दरम्यान घडली असून सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेच्या दोन दिवसांनंतर म्हापसा पोलिसांनी चार जणांच्या टोळीला सिंधुदुर्गातून जेरबंद केले आणि चोरीचे सोने जप्त केले.


कारवार मर्डर मिस्ट्री

आईच्या श्राद्धासाठी हणकोण-कारवार या गावी आलेल्या पुण्यात व्यवसाय करणाऱ्या विनायक नाईक यांची हत्या करण्यात आली, तर त्यांच्या पत्नीला मारहाण करून जखमी करण्यात आले. कारवार पोलिसांना हत्येमागे गोवा कनेक्शन असल्याचे दिसून आले. फोंडा येथील व्यापारी गुरुप्रसाद राणे यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. तपास सुरू असताना संशयित राणे यांचा मृतदेह मांडवी नदीत तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे ही प्रकरणे आणखी गुंतागुंतीची झाली. त्यानंतर, विनायकचे मारेकरी अजमल जाबीर आणि मासूम मंजूर (दोघेही बिहार) यांना दिल्ली आणि रेल्वे पोलिसांनी अटक केली, तर आसामच्या लक्ष गोपीनाथला मोपा विमानतळावरून अटक करण्यात आली. मात्र, विनायकच्या हत्येमागील कारण पोलिसांसाठी गूढच राहिले आहे.

अधूनमधून पडणाऱ्या पावसाने दमवले

गेल्या मंगळवारी गोव्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागात पाणी साचले होते. वेर्णा-लोटली महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अंत्रुजनगर-फोंडा येथे संरक्षक भिंत कोसळली.

पणजीतील बसस्थानक, मळा आणि पाटो परिसर जलमय झाला होता. १८ जून दयानंद बांदोडकर मार्ग आणि पणजी बाजारातील रस्ते जलमय झाले होते. १ जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी १६७.६२ इंच पाऊस झाला. पणजीत ९ तासांत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ४ इंच पावसाची नोंद झाली.


अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला. त्याला घटनास्थळी नेले जात असतानाच मुंब्रा येथे पोहोचताच पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या डोक्यात गोळी झाडली. रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. नंतर हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाने या चकमकीप्रकरणी पोलिसांना फटकारले असून चकमक सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.


बालरथांना ब्रेक

अनुदानित शाळांना यापुढे बालरथ न देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपासच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय राज्यातील मुलांसाठीच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने संचालनालयाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्लीत बैठक बोलावली होती. एका राज्याने शाळांसाठी बसेस उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. याप्रकरणी त्यांनी संताप व्यक्त करत केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले.


कंत्राटदारानंतर अभियंतेही रडारवर

राज्यातील २७ कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३० अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भविष्यात यात कोणीही दोषी असेल तर कंत्राटदार आणि अभियंता दोघांनाही शिक्षा होईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विकास केल्याचा दावा करणाऱ्या मंत्र्यांनी २० वर्षांत या खात्याला न्याय दिला नाही. रस्त्यांची दुरवस्था हा मोठा प्रश्न बनला आहे. जेव्हा मी ही खाती हाती घेतली तेव्हा माझ्या हे लक्षात आले. अशी कठोर भूमिका आपण कायम ठेवू आणि नोव्हेंबरपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी

• रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना मोठा दंड आणि त्यांची वाहने जप्त केली जातील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

• कृषिमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीने तयार केलेल्या कृषी धोरणाचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर, तो लोकांसाठी सूचनांसाठी खुला केला जाईल.

• प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. शिक्षण खात्याच्या शैक्षणिक संस्थाना निर्देशासहित सूचना.

• अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळण्यासाठी सरकारने धनगर समाजाला ‘गवळी धनगर’ म्हणून अधिसूचित केल्यानंतरही रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने (आरजीआय) राज्य सरकारचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा २ सप्टेंबर रोजी केंद्रीय आदिवासी मंत्रालयास पत्र पाठवल्याची माहिती सरकारमधील सूत्रांकडून मिळाली आहे.

• उद्योजकांनी स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील याचा विचार करुन प्रकल्प उभारावेत, असे उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यांचे गुंतवणूकदारांना आवाहन.

• सर्वाधिक पगार देणारे राज्य म्हणून गोवा पाचव्या स्थानावर. मिझोरम पहिल्या, नागालँड दुसऱ्या आणि पंजाब शेवटच्या क्रमांकावर आहे.

• तिलारी धरणाच्या गोव्यातील ओलीताखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून बांधकामे करण्यात आली आहेत. यात व्यावसायिक बांधकामांचाही समावेश आहे. कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या (काडा) जमिनीत झालेले अतिक्रमण तसेच बांधकामांचा अहवाल ‘काडा’चे अध्यक्ष या नात्याने जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मागवला आहे.

• पर्यटन, फार्मसी, आयटी आणि इतर क्षेत्रात २ लाख नोकऱ्या रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात एकही बेरोजगार राहणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

• कला अकादमीबाबत सूचना करण्यासाठी तेरा सदस्यीय कृती दलाची स्थापना. प्रसाद लोलयेकर यांची सरकार-समितीत समन्वयासाठी नियुक्ती.

• कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण करणारे चार कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सील, सिंगल माल्ट व्हिस्कीचे उत्पादन करणाऱ्या जॉन डिस्टिलरीचा समावेश.

हेही वाचा