राज्यात कमावत्या महिलांच्या टक्केवारीत किरकोळ घट

महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:43 pm
राज्यात कमावत्या महिलांच्या टक्केवारीत किरकोळ घट

पणजी : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमावणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली आहे. एका वर्षात विविध क्षेत्रात नोकरी, रोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात ०.७ टक्क्यांनी घट झाली आहे.

२०२२-२३ मध्ये राज्यातील कार्यशक्तीत महिलांचे प्रमाण २१.९ टक्के होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार २०२३-२४ मध्ये ते प्रमाण कमी होऊन २१.२ टक्के झाले आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्यातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.


राज्यातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. देशात महिला कार्यशक्तीचे सरासरी प्रमाण २७.१ टक्के आहे. ही आकडेवारी जुलै २०२३ ते जून २०२४ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातील आहे. यामध्ये १५ वर्षांवरील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले होते. याआधी राज्यात २०१९-२० मध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण २२.६ टक्के, २०२०-२१ मध्ये २२.६ टक्के तर २०२१-२२ मध्ये १७ टक्के होते.

गोवा चौथ्या क्रमांकावर 

अहवालानुसार राज्याच्या कार्यशक्तीत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी असणाऱ्या क्रमवारीत गोवा चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत हरयाणा मध्ये हा दर सर्वात कमी म्हणजे १७.२ टक्के आहे. यानंतर बिहार (१८ टक्के), उत्तर प्रदेश (१९.८ टक्के) आणि पंजाब (२३.१ टक्के ) यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे सिक्कीम येथे एकूण कार्यशक्तीत महिलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५५.१ टक्के आहे. त्या खालोखाल हिमाचल प्रदेश (५०.२ टक्के), अरुणाचल प्रदेश (४९ टक्के), मेघालय (४६ टक्के), नागालँड (४०.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.