दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात मेगा म्युटेशन

६८५ प्रकरणे निकाली : ५९१ प्रकरणांची दुहेरी नोंद असल्याने फेटाळली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:42 pm
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात मेगा म्युटेशन

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी मेगा म्युटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सात ठिकाणी अर्जांची छाननी व इतर प्रक्रिया केली जात होती. या शिबिरात ६८५ म्युटेशन प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातील ५९१ प्रकरणांची दुहेरी नोंद असल्याने ती फेटाळण्यात आली.


मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोवा वकील संघटनेकडून प्रलंबित असलेल्या म्युटेशन प्रकरणांबाबत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांच्याकडे चर्चा केली होती. त्यानुसार शनिवारी मेगा म्युटेशन शिबिराचे आयोजन केले होते. यापूर्वी राज्यातील लोकसभा निवडणुकांवेळी अधिकार्यांच्या झालेल्या बदल्या व त्यानंतर पावसाळ्यांतील नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे म्युटेशन प्रक्रिया रखडली होती. आता दक्षिण गोव्यात सुमारे १२०० म्युटेशनची प्रकरणे प्रलंबित आहेत असे दिसते. आता म्युटेशनच्या शिबिरात प्रकरणांच्या अर्जांची छाननी केली असता काहीजणांनी ऑनलाईन अर्ज केलेला असतानाही पुन्हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे म्युटेशन प्रकरणांची संख्या जास्त दिसत असल्याचे ते म्हणाले.