काणकोण तालुक्यात किडनीनंतर आता कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ

एकाला तोंडाचा कॅन्सर; बाराजण लागण होण्याआधीच्या पातळीवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:37 pm
काणकोण तालुक्यात किडनीनंतर आता कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ

पणजी : काणकोण तालुक्यात किडनीनंतर कॅन्सरच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाने (गोमेकॉ) कॅन्सर स्क्रिनिंग अभियानाअंतर्गत शनिवारी केलेल्या चाचणीतून दिसून आले. काणकोणातील ९० पुरुष आणि १९६ महिला अशा २८६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात एकाला दुसऱ्यांदा तोंडाचा कॅन्सर झाल्याचे, तर बाराजण कॅन्सरच्या जवळ पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोमेकॉने गेल्या काही दिवसांपासून मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सर स्क्रिनिंग अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत मंडूर, वाळपई, कुडचडे आणि साखळी या चार ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. त्यात ७६९ जणांची मोफत चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एकाला मुखाचा, तर एका महिलेला स्तनाच्या कॅन्सरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय या चार भागांतील ३० जण कॅन्सरची लागण होण्याआधीच्या पातळीवर असल्याचे, त्यातील २४ जण तोंडाच्या कॅन्सरशी संंबंधित, तर ६ जण स्तनाच्या कॅन्सरशी संबंधित असल्याचेही उघड झाले होते.

गोमेकॉने शनिवारी ही मोहीम काणकोण तालुक्यात राबवली. त्यात एकूण २८६ जणांची मोफत करण्यात आली. त्यावेळी एकाला दुसऱ्यांदा तोंडाचा कॅन्सर झाल्याचे, तर बारा जण विविध प्रकारचा कॅन्सर होण्याआधीच्या पातळीवर असल्याचे समोर आल्याचे गोमेकॉच्या कम्युनिटी विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले. याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सरसंदर्भात ७१ महिलांचे नमूने गोमेकॉने तपासणीसाठी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोमेकॉच्या या मोहिमेचा विविध भागांतील लोकांना मोठा फायदा मिळत आहे. या मोहिमेत कॅन्सरची लागण झालेल्या तसेच संशयितांची तत्काळ ओळख पटत असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे गोमेकॉने या मोहिमेला पुढील काळात आणखी गती देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ ऑक्टोबरला कुडतरी मतदारसंघात मोहीम राबवण्यात येणार असल्याचे डॉ. जगदीश काकोडकर यांनी सांगितले.