राज्यात डिसेंबरपासून रस्ते हॉटमिक्स

‘कारणे दाखवा’च्या उत्तरासाठी अभियंत्यांना आठ दिवसांची मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:36 pm
राज्यात डिसेंबरपासून रस्ते हॉटमिक्स

पणजी : राज्यातील सर्वच रस्त्यांची येत्या नोव्हेंबर अखरेपर्यंत दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर डिसेंबरपासून हॉटमिक्स डांबरीकरण सुरू होईल. ३० अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा जारी करण्यात आल्या असून, उत्तरासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांवर प्रथमच कारवाईचे हत्यार उगारले. त्यामुळे भयभीत झालेल्या कंत्राटदार आणि अभियंत्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत गांभीर्याने विचार सुरू केला आहे.

राज्यात अजूनही अधूनमधून मान्सूनच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होताच सर्वच निकृष्ट रस्त्यांची नोव्हेंबर अखेरपर्यंत दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर तत्काळ हॉटमिक्स डांबरीकरण सुरू केले जाईल, असेही पार्सेकर यांनी नमूद केले.


दरम्यान, राज्यातील निकृष्ट रस्त्यांबाबत सरकारने २७ कंत्राटदारांना काहीच दिवसांपूर्वी ‘कारणे दाखवा’ नोटिसा जारी केल्या. त्याचवेळी अशा रस्त्यांना जबाबदार अभियंत्यांवरही कारवाई करण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी ३० अभियंत्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवण्यात आल्या असून, उत्तरासाठी आठ दिवसांची मुदत बांधकाम खात्याकडून देण्यात आली आहे.

दोन महिन्यांत अंतर्गत वाहिन्यांची कामे करण्याचे पार्सेकर यांचे निर्देश

रस्त्यांची दुरुस्ती करण्यास ‘पीडब्ल्यूडी’कडे अजून दोन महिन्यांचा काळ आहे. या कालावधीत वीज, जलस्रोत खात्यांनी रस्ते फोडून अंतर्गत वाहिन्यांची कामे पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश त्यांना जारी करण्यात आले आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कोणत्याही​ खात्याला रस्ते फोडू दिले जाणार नाहीत. डिसेंबरपासून रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, असेही उत्तम पार्सेकर यांनी स्पष्ट केले.