कोलवाळमध्ये इमारतीवरून पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th September, 11:16 pm
कोलवाळमध्ये इमारतीवरून पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

म्हापसा : घरात खेळत असताना दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून जखमी झालेल्या लक्ष्य पटेल (रा. मूळ मध्यप्रदेश) या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कोलवाळ येथील टिचर्स कॉलनीमध्ये घडली.

बुधवार, दि. २५ रोजी संध्याकाळी ५.३० वा. लक्ष्य हा घरात खेळत होता. त्याची आई घरात घरकाम करीत होती तर, कामावरून आलेले वडील झोपले होते. आईच्या नकळत हा बालक फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आला. नंतर तो खेळतच बाल्कनीच्या कठड्यावरील लोखंडी रॅलिंगमध्ये शिरला व तिथून तोल जाऊन खाली पडला.

हा प्रकार निदर्शनास येताच पालकांसह शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गभीर जखमी बालकाला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून त्याला पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठवण्यात आले. गुरूवारी २६ रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला.

शुक्रवारी शवचिकित्सेनंतर बालकाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. कोलवाळ पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले आहे.

दरम्यान, बालकाचे वडील हे कोलवाळ औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये नोकरी करतात. ते घटनास्थळी दुमजली इमारतीमधील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. 

हेही वाचा