सिलिंडर चोरीचा छडा लावताना सापडली अट्टल चोरांची टाेळी

पाचपैकी तिघे बेतोड्यातील : मंदिरे, घरांत करायचे चोऱ्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th September, 11:09 pm
सिलिंडर चोरीचा छडा लावताना सापडली अट्टल चोरांची टाेळी

फोंडा : कासारवाडा-बेतोडा येथे चोरीस गेलेल्या ५ हजार रुपये किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गेलेल्या फोंडा पोलिसांच्या हाती मोठे घबाड हाती लागले. गेल्या काही महिन्यात विविध ठिकाणी मंदिरे तसेच घरात चोरी करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मास्टर माईंड विश्वेश सालेलकर (पणसपाणी - बेतोडा), शुभम गावकर (तळे- बेतोडा), रजत श्रीकांत नाईक (३१, तळे - बेतोडा), देवशरण श्याम कार्तिक (३४, मूळ मध्यप्रदेश) व महंमद अली (२१, मूळ उत्तर प्रदेश) या पाच जणांना अटक केली आहे. चोरीचा मास्टरमाईंड असलेल्या विश्वेश सालेलकर याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू करण्यात आले आहेत. अवघ्या ५ हजारांचा चोरी केलेला गॅस सिलिंडर चोरांच्या टोळीसाठी कर्दनकाळ ठरला. मात्र, गावातील चोरटे असल्याचे उघड झाल्याने बेतोडा परिसरात खळबळ उडाली आहे.

कासारवाडा - बेतोडा येथील मलिक अब्दुल करीम लावर यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये घुसून अज्ञातांनी बुधवारी दिवसा घरगुती गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना घडली होती. फोंडा पोलिसांनी सुमारे ५ हजार रुपये किमतीचा घरगुती गॅस सिलिंडर चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानुसार चौकशी केली असता पोलिसांची सर्वप्रथम शुभम गावकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी अनेक चोऱ्या केल्याचे तपासात उघड झाले. अन्य साथीदारांची नावे दिल्यानंतर पोलिसांनी इतरांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच विविध ठिकाणी चोरी केलेल्या समई, घंटा, बॅटऱ्या व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आलेली आलिशान कारसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. संशयितांनी डिचोली, वाळपई, काणकोण व अन्य भागांत चोऱ्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गांजे येथील गांजेश्वरी मंदिर, पिळये येथील भूमिका देवस्थान व बोरी येथील सिद्धनाथ मंदिरात अटक केलेल्या संशयितांनी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. फोंडा परिसरात संशयितानी अनेक वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्या आहेत. उपअधीक्षक अर्शी आदिल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी या प्रकरणी तपास केला.

अटक केलेला चोर उपचारासाठी गोमेकॉत दाखल

फोंडा पोलिसांनी घरगुती गॅस सिलिंडर चोरी प्रकरणी ताब्यात घेऊन अटक केलेल्या विश्वेश सालेलकर याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले. सुत्रांकडून मिळाललेल्या माहितीनुसार, गोमेकॉतील डॉक्टरांनी त्याला ५ दिवस उपचारासाठी इस्पितळात राहण्यास सांगितले आहे. मात्र, संशयित उपचार करून घेण्याऐवजी घरी जाण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती करीत आहे. 

हेही वाचा