बाशुदेव उत्तम पोहणारा; मुलीबाबत कुटुंबीयांना संशय!

आखाडा फेरी धक्क्यावरील दुर्घटनेत बेपत्ता युवकाचा थांगपत्ता नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th September, 11:07 pm
बाशुदेव उत्तम पोहणारा; मुलीबाबत कुटुंबीयांना संशय!

पणजी : सांतइस्तेव बेटावरील आखाडा फेरी धक्क्यावर रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी उत्तररात्री झालेल्या दुर्घटनेत रेंट अ कार रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट नदीत गेली होती. या दुर्घटनेत बेपत्ता झालेला कारचालक बाशुदेव भंडारी (२२) याचा अजून पत्ता लागलेला नाही. त्याला व्यवस्थित पोहता येत असल्याचा दावा करून त्याच्या कुटुंबीयांनी संबंधित मुलीवर संशय व्यक्त केला आहे.

गुजरात येथील बाशुदेव भंडारी साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थिनीला भेटण्यासाठी गोव्यात आला होता. ते दोघेही १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.४५ वा. रेंट अ कारने साखळीहून हणजूणला निघाले होते. त्यापूर्वी त्या दोघांनी साखळी येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. त्यानंतर ते दोघे हणजणूला निघाले. याच दरम्यान माशेल येथे त्यांच्या गाडीने एका कारला धक्का दिला. त्या कारने त्यांचा पाठलाग केला. निळ्या गाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात ते आखाडा-सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचले. काळोखात रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट नदीत गेली होती. प्रसंगावधान राखून कारमधील दोघांनी बाहेर पडत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. युवती सुखरूप किनाऱ्यावर आली, तर गुजरात येथील बाशुदेव भंडारी पोहता येत नसल्यामुळे नदीत बुडाला. अशी माहिती युवतीने जुने गोवा पोलिसांना दिली. दरम्यान जुने गोवा पोलिसांनी किनारी पोलीस, अग्निशामक दल आणि नौदलाच्या जवानांची मदत घेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही त्याचा पत्ता लागला नाही.

मुलीच्या चौकशीची मागणी

पोलिसांनी निळ्या रंगाची सेडान कार जप्त करून त्यातील दोघांची चौकशी केली. या प्रकरणी बाशुदेव भंडारी याच्या कुटुंबीयांनी संबंधित युवतीची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यात त्यांनी बाशुदेव भंडारी याला चांगले पोहता येत असल्याचा दावा केला. 

हेही वाचा