यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिपची घोषणा

१८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान स्पर्धेचे आयोजन : एकूण १० लाख रुपयांची बक्षिसे

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th September, 10:11 pm
यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिपची घोषणा

पणजी : गोवा टेबल टेनिस असोसिएशन (जीटीटीए) आणि टीटीएफआयतर्फे आगामी यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिपची घोषणा करण्यात आली. स्पर्धा १८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, नावेली येथे खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेत १२ गटांमध्ये युवा मुलगे आणि मुली एकेरीत ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गटात, पुरुषांचे एकेरी व महिलांच्या एकेरी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (टीटीएफआय) तांत्रिक समितीचे चेअरमन एन. गणेशन यांनी या स्पर्धेबाबत अधिक माहिती दिली.

दरवर्षी आयोजित केलेल्या एकूण पाच राष्ट्रीय मानांकन स्पर्धांपैकी ही वर्षातील दुसरी मानांकन स्पर्धा आहे. गोवा गेल्या दोन हंगामात डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आपले नाव कोरत आहे. या चॅम्पियनशिपद्वारे गोव्याचे राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान पक्के करण्याचे उद्दिष्ट आहे.

गणेशन यांनी स्पर्धेतील स्पर्धात्मक महत्त्व अधोरेखित केले आणि बक्षीस रकमेत १५ टक्क्यांची वाढ नोंदवली जी आता एकूण १० लाख रुपये आहे, असे सांगितले. सर्व श्रेण्यांमधील विजेत्यांना मिळालेल्या बक्षिसांमध्ये ही लक्षणीय वाढ इव्हेंटची स्पर्धात्मकता आणि उत्साह वाढवेल अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत देशातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सहभाग असेल ज्यामध्ये जगातील अव्वल १०० मध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूंचा समावेश आहे. ब्लू बॅज पंच आणि आंतरराष्ट्रीय रेफरींसह ६० ते ७० हून अधिक अधिकारी २० ते २४ टेबलांवर लक्ष ठेवतील. टीटीएफआयचा यूटीटी आणि स्टॅग ग्लोबल यांच्याशी दीर्घकालीन करार आहे जे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत, असे गणेशन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मुख्य संरक्षक

आयोजन समितीच्या सदस्यांमध्ये मुख्य संरक्षक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संरक्षक क्रीडामंत्री गोविंद गावडे, श्रीनिवास धेंपो (अध्यक्ष), अरविंद खुटकर (संचालक, डीएसवायए), डॉ. गीता नागवेकर (कार्यकारी संचालक, एसएजी), सुदिन वेर्णेकर (अध्यक्ष), ख्रिस्तोफर मिनेझिस (सचिव), ऐश्वर्या नुनेस (कोषाध्यक्ष) यांचा समावेश आहे. इतर प्रमुख समिती प्रमुखांमध्ये मयूर सावकार (फायनान्स), अल्विटो डी'सिल्वा (लॉजिस्टिक्स), कबीर पिंटो माखिजा (सेरेमोनिअल), अमेय लवंदे (स्थळ), एडविन मिनेझिस (मीडिया आणि प्रसिद्धी), अजित घनटकर (तांत्रिक), नीलेश कीर्तनी यांचा समावेश आहे.