मूळ गोमंतकीय कॅरोलिन फर्नांडिसची जागतिक स्केट गेम्समध्ये चमक

चीनला नमवत भारताने पटकावले स्पर्धेत कांस्यपदक

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th September, 10:09 pm
मूळ गोमंतकीय कॅरोलिन फर्नांडिसची जागतिक स्केट गेम्समध्ये चमक

पणजी : मूळ गोमंतकीय परंतु मुंबईस्थित कॅरोलिन फर्नांडिसने भारताचे प्रतिनिधित्व करत जागतिक स्केट गेम्स २०२४ मध्ये रोलर डर्बी प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली. इटलीमध्ये झालेल्या या स्पर्धेत जगभरातील आघाडीच्या संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. या स्पर्धेत भारताला कांस्यपदक प्राप्त झाले.

अमेरिकेने या खेळात आपले वर्चस्व दाखवून प्रथम स्थान मिळविले तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या रोमहर्षक लढतीत भारताने चीनवर मात करत कांस्यपदक मिळवून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली.

कॅरोलिन फर्नांडिसचा जागतिक स्केट गेम्सपर्यंतचा प्रवास हा रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कडक निवड प्रक्रियेचा परिणाम होता. जबरदस्त कौशल्य आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन केल्यामुळे तिला राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तयारीसाठी व्यापक प्रशिक्षण घेतले. तिने चंदीगड, कोईम्बतूर आणि दिल्ली येथे आयोजित केलेल्या तीन प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला, जेथे तिने देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबरोबरच तिच्या कौशल्यांना पैलू पाडले.

कॅरोलिनच्या यशाचा गोव्यालाही अभिमान

वर्ल्ड स्केट गेम्स २०२४ मधील तिची कामगिरी तिच्या समर्पणाचा आणि भारतातील रोलर डर्बीच्या वाढत्या दबदब्याचा पुरावा आहे. कॅरोलिनच्या यशामुळे देशाचा व गोव्याचाही गौरव वाढला आहे आणि जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंच्या क्षमतेवर प्रकाश टाकला आहे. ती पुष्पेंद्र कुमार सिंग आणि आदेश सिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेत आहे.