अष्टपैलू कमिंदू मेंडिसचे कारकिर्दीत ५ वे कसोटी शतक

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा धावांचा डोंगर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th September, 09:52 pm
अष्टपैलू कमिंदू मेंडिसचे कारकिर्दीत ५ वे कसोटी शतक

गॉल : श्रीलंकेचा अष्टपैलू कमिंदू मेंडिसने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले. मेंडिसने केवळ ८ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ५ वे शतक झळकावले आहे. त्याच्या शतकामुळे श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत आला आहे.

या शतकासह कमिंदूने महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी केली आहे. त्यांनी पहिल्या १३ डावांत ५ शतके झळकावली होती. मात्र, सर्वात वेगवान ५ कसोटी शतकांचा विक्रम एव्हर्टन वीक्सच्या नावावर आहे. त्यांनी अवघ्या १० डावांत ही कामगिरी केली. एवढेच नाही तर या सामन्याच्या पहिल्याच दिवशी मेंडिसने अर्धशतक झळकावून आश्चर्यकारक विश्वविक्रम केला होता. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात, पदार्पणानंतर सलग ८ कसोटी सामन्यांमध्ये पन्नासहून अधिक धावा करणारा कमिंदू मेंडिस हा जगातील पहिला खेळाडू ठरला.

भारतीय क्रिकेटपटूचा विक्रम बचावला

कमिंदू मेंडिस गॉलेमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३वा डाव खेळत असून शतक झळकावल्यानंतर त्याने ९०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह तो कसोटीतील सर्वांत कमी डावांत ९०० धावा करणारा ५वा फलंदाज ठरला आहे. कसोटीत सर्वात जलद ९०० धावा करण्याचा विक्रम भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि वेस्ट इंडिजच्या एव्हर्टन वीक्स यांच्या नावावर आहे. या दोघांनी ११ डावांत ही कामगिरी केली होती. सुनील गावस्कर यांनी यासाठी १२ कसोटी डाव खेळले होते.

श्रीलंका मजबूत स्थितीत

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवात चांगली झाली नाही. २ धावांवर संघाने पहिली विकेट गमावली होती. मात्र यानंतर सर्व फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. दिनेश चंडिमल आणि कमिंदू मेंडिस यांनी शतके झळकावली. तर दिमुथ करुणारत्नेने ४६ धावा, अँजेलो मॅथ्यूजने ८८ धावा आणि कर्णधार धनंजय डी सिल्वाने ४४ धावा केल्या. यामुळे श्रीलंकेच्या संघाने ५ बाद ६०२ धावांवर डाव घोषित केला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने २ गडी गमावून २२ धावा केल्या असून ते अजूनही ५८० धावांनी पिछाडीवर आहेत.