कानपूर कसोटी होणार कडेकोट बंदोबस्तात

२ हजार पोलीस तैनात : अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th September, 11:41 pm
कानपूर कसोटी होणार कडेकोट बंदोबस्तात

कानपूर : बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर  अखिल भारतीय हिंदू महासभेने कानपूर येथील कसोटी रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट मॅच सिरीजमधील दुसरा सामना कडेकोट पोलीस बंदोबस्तात खेळवण्यात येणार आहे. दरम्यान अखिल भारतीय हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) हरीश चंदर म्हणाले की, भारतीय आणि बांगलादेशी संघांना चकेरी विमानतळावरून कडेकोट बंदोबस्तात हॉटेलमध्ये नेण्यात आले. ते म्हणाले की, दोन्ही संघ त्यांच्या हॉटेलपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रीन पार्क स्टेडियमवर स्वतंत्र सराव सत्रे घेतील.

दोन्ही संघातील खेळाडूंचे पंचतारांकित हॉटेलमध्ये आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. ज्या हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार आहेत, त्या हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले, 'संघ आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी सुमारे २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ग्रीन पार्क स्टेडियमवरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला १ हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, आम्ही सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करत नाही आणि संघांनाही मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. टीम सदस्यांना हॉटेल सोडण्यापूर्वी आगाऊ सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की ते प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी माहिती सामायिक करण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि राज्य गुप्तचर संस्थांसह केंद्रीय आणि राज्य संस्थांशी समन्वय साधत आहेत.

सोशल मीडियावर कडक नजर

या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रीन पार्क स्टेडियम आणि हॉटेल लँडमार्कची ‘सेक्टर’, ‘झोन्स’ आणि ‘सब-झोन’मध्ये विभागणी करण्यात आली असून त्यांचे नियंत्रण पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

एक स्टँड कोसळण्याची शक्यता

स्टेडियमचा एक स्टँड कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने त्या स्टँडची तिकिटे न विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेडियमची ‘बाल्कनी सी’ अनफिट घोषित करण्यात आली आहे. एकूण ४८०० लोकांची क्षमता असलेली बाल्कनी सी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील केवळ १७०० तिकिटांचीच विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अंकित चॅटर्जी म्हणाले, पीडब्ल्यूडीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे आम्ही बाल्कनी सी मधील सर्व तिकिटे विकणार नाही. 


अश्वीनला खुणावताहेत विक्रम

कानपूरचे मैदान आर अश्वीनसाठीही खूप खास असणार आहे, कारण या मैदानावर तो एक-दोन नव्हे तर सहा मोठे विक्रम मोडू शकतो. याशिवाय अश्वीनला ११ च्या जादुई आकड्याला स्पर्श करण्याची संधी आहे. ज्याला स्पर्श करणे विराट कोहलीसाठीही स्वप्नासारखे आहे.  चेन्नई कसोटीत आर अश्वीन सामनावीर ठरला. आता तो कानपूर कसोटीतही सामनावीर ठरला किंवा त्याने बॉल आणि बॅट दोन्हीत चांगली कामगिरी केली, तर तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा दावेदार असेल. आता जर अश्वीनला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, तर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील त्याला हा पुरस्कार मिळण्याची ही ११ वी वेळ असेल. अश्वीन हा असा खेळाडू आहे, ज्याने भारतासाठी कसोटीत सर्वाधिक १० मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत. सध्याच्या संघातील विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याने कसोटीत जास्त वेळा मालिका सर्वोत्तम पुरस्कार जिंकला आहे. अश्वीन व्यतिरिक्त सचिन-सेहवागने ५-५, द्रविड-हरभजन, कुंबळे, कपिल देव यांनी ४-४ प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्कार जिंकले आहेत. अश्वीन ११व्यांदा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर हा खेळाडू मुथय्या मुरलीधरनची बरोबरी करेल.कानपूरची खेळपट्टी काळ्या मातीची आहे. त्यामुळे खेळपट्टी कधीही मूड बदलू शकते. मागील काही सामन्यात बॉलला उसळी मिळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे फास्टर्स गोलंदाजांना या मैदानात कमाल दाखवता येईल. तर खेळपट्टी संथ झाल्यावर स्पिनर्स आपली कमाल दाखवू शकतात. 

अश्वीन मोडू शकतो ६ विक्रम

अश्वीनला बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याची संधी आहे. झहीर खानने या संघाविरुद्ध सर्वाधिक ३१ विकेट घेतल्या आहेत.

अश्वीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनू शकतो. या बाबतीत जोश हेजलवूड ५१ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.

अश्वीनने पुन्हा एकदा एका डावात पाच विकेट घेतल्यास, तो शेन वॉर्नला मागे टाकेल. अश्वीनच्या नावावर सध्या ३७ वेळा पाच विकेट्स आहेत.

अश्वीनने कानपूर कसोटीत ९ विकेट घेतल्यास तो नॅथन लायनला मागे टाकेल आणि सध्याच्या युगात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा ऑफस्पिनर बनेल.