वुमन्स टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रथमच ‘महिलाराज’

पंच, सामनाधिकारी म्हणून महिला बजावणार भूमिका : आयसीसीची घोषणा, ३ ऑक्टोबरपासून स्पर्धेला प्रारंभ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th September, 11:59 pm
वुमन्स टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रथमच ‘महिलाराज’

यूएई : महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह दहा संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. तसेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने एक एकदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला संघ यंदा जेतेपद मिळवेल का? असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला आहे. असे असताना आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. पहिल्यांदाच संपूर्ण स्पर्धेत महिलाराज पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत सामनाधिकारी असो की पंच, या सर्व भूमिका महिलाच बजावणार आहेत.
दरम्यान, आयसीसीने याबाबतची अधिकृत घोषणा केली असून या स्पर्धेसाठी १० पंच, तीन सामनाधिकाऱ्यांसह एकूण १३ जणांची अधिकृत घोषणा केली आहे. महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २० ऑक्टोबरला होणार आहे. एकूण २३ सामने या स्पर्धेत होणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला देशातील स्थिती पाहता या स्पर्धेचे आयोजन यूएईत करावे लागत आहे.
आयसीसीच्या पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापक सीन ईजीने सांगितलं की, आमच्या खेळातील महिलांच्या प्रगतीसाठी योगदान दिल्याबद्दल आयसीसीला अभिमान आहे. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपसाठी महिलांना पंच आणि सामनाधिकारी म्हणून घोषित केल्याचा आनंद आहे. ही खरीच एक अद्भूत घटना आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अनुभवी व्यक्तींना समितीत स्थान मिळाले आहे. या पंचांना टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पंचगिरी करण्याचा अनुभव आहे.
क्लेयर पोलोसाक पाचव्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पंचगिरी करताना दिसणार आहे. तर किम कॉटन आणि जॅकलीन विल्यमसन चौथ्यांदा पंचाची भूमिका बजावतील. मागच्या पर्वात अंतिम फेरीत सू रेडफर्न टीव्ही पंच होती. टी-२० वर्ल्डकपमध्ये चौथ्यांदा ही भूमिका बजावणार आहे. झिम्बाब्वेची सारा दंबनेवाला पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेईल. तर जीएस लक्ष्मीला १२ वर्षांचा अनुभव आहे.
........
सामनाधिकारी : शँड्रे फ्रिट्ज, जीएस लक्ष्मी, मिचेल परेरा.
सामना पंच : लॉरेन एजेनबॅग, किम कॉटन, सारा दंबनेवाला, अन्ना हॅरिस, निमाली परेरा, क्लेयर पोलोसाक, वृंदा राठी, सू रेडफर्न, एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विल्यम्स.