गुळेली, खोतोडा, ठाणे, भिरोंडा पंचायतींच्या उपसरपंचांचा राजीनामा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th September, 11:49 am
गुळेली, खोतोडा, ठाणे, भिरोंडा पंचायतींच्या उपसरपंचांचा राजीनामा

वाळपई : सत्तरी तालुक्यातील गुळेली, खोतोडा, ठाणे व भिरोंडा पंचायतीच्या उपसरपंचानी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे आता सदर पंचायतींच्या उपसरपंचाची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


डोंगुर्ली - ठाणेतील तनया तुळशीदास गांवकर, खोतोडा पंचायतीच्या नंदिनी म्हाळशेकर, भिरोंडा पंचायतीच्या मनिषा पिळयेकर, गुळेली पंचायतीच्या अक्षिता गावडे यांनी अलिखित कराराप्रमाणे आपापल्या उपसरपंच पदांचा राजीनामा दिला आहे.

सत्तरी तालुक्यातील एकूण १२ ग्रामपंचायतींपैकी सरपंच व उपसरपंच बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आतापर्यंत अनेक पंचायतीच्या सरपंचांची नवीन निवड झाली आहे. तर सध्या एकूण १२ ग्रामपंचायतींपैकी ४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. यामध्ये गुळेली, खोतोडा, ठाणे व भिरोंडा या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या ४ पंचायतीच्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्याची माहिती गटविकास अधिकारी राणे यांनी दिलेली आहे. उपसरपंचांचा राजीनामा गटविकास कार्यालयामध्ये सादर झाला आहे. यामुळे लवकरच नवीन उपसरपंचांची निवड होण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. यापूर्वी केरी, पर्ये, ठाणे, नगरगाव, म्हाऊस या ग्रामपंचायतीसाठी नवीन सरपंचाची निवड झाली आहे.