महिला आयपीएलवर ‘मुंबई राज’

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th March 2023, 12:17 am
महिला आयपीएलवर ‘मुंबई राज’

मुंबई : महिला प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती जिंकून मुंबई इंडियन्सने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएलवर आपले नाव कोरले. सेविर ब्रंटने मोक्याच्या क्षणी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले १३२ धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले. पहिल्या वहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर त्यांनी नाव कोरले.
दरम्यान, या स्पर्धेत मुंबईकडून गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी पाहायला मिळाली. वुमन्स प्रिमीयर लिगमधील आघाडीच्या पाच गोलंदाजात मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. तर फलंदाजीतही मुंबईच्या खेळाडूंचा बोलबला राहिला. केर, ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी संपूर्ण हंगामात अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले.
दिल्लीने मुंबईला विजयासाठी १३२ धावांचे आव्हान दिले होते. पण, मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फंलदाज हेली मॅथ्यूज १३ आणि यात्सिका भाटिया ‍४ धावा काढून तंबूत परतल्या. २३ धावांत मुंबईला दोन मोठे धक्के बसले होते. पण, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सेविर ब्रंट यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी मुंबईला विजयाकडे नेले. पण, मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत धावबाद झाली. मुंबईच्या अडचणी वाढणार असे वाटत होते. पण, ब्रंट हिने विस्फटोक फलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. ब्रंट हिला अॅमिला केर हिने १४ धावा काढत चांगली साथ दिली. ब्रंट हिने नाबाद ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ब्रंट हिने सात चौकार लगावले. तर केर हिने दोन चौकार मारले. ब्रंट हिचे अर्धशतक आणि हरमनप्रीतची निर्णायाक खेळीच्या बळावर मुंबईने दिल्लीने दिलेले आव्हान तीन चेंडू आणि सात विकेट राखून पार केले.
मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात सुरुवातीला दिल्लीची कर्णधान मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक दिल्लीला धक्के दिली. दिल्लीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले होते. अवघ्या ८० धावांत दिल्लीचे ७ विकेट गेल्या होत्या. ८७ धावांत दिल्लीचे नऊ फलंदाज माघारी परतले होते. पण, शिखा पांडे आणि राधा यादव यांनी विस्फोटक फलंदाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. दहाव्या विकेटसाठी दोघांनी चार धावा जोडल्या. शिखा पांडे २७ नाबाद राहिली तर राधा यादव हिने नाबाद २७ धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार मेग लॅनिंग हिने ३५ धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकून इस्सी वोंग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. तर ए केर हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : २० षटकांत ९ बाद १३१ धावा
मुंबई इंडियन्स : १९.३ षटकांत ३ बाद १३४ धावा
सामनावीर : नॅट सायव्हर-ब्रंट