स्वीस ओपन : सात्विक-चिराग बनले चॅम्पियन

पुरुष दुहेरीमध्‍ये चीनच्‍या जोडीचा पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th March 2023, 12:16 am
स्वीस ओपन : सात्विक-चिराग बनले चॅम्पियन

सात्विक-चिराग

बासेल : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या बॅडमिंटन खेळातील अव्वल दर्जाच्या दुहेरी जोडीने बासेल येथील स्विस ओपन २०२३ मोसमातील पहिले विजेतेपद जिंकले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले आणि चीनच्या रेन झियांग यू आणि तांग कियांग यांचा सरळ गेममध्ये पराभव केला.
सात्विक आणि चिराग यांनी जागतिक क्रमवारीत २१ नंबरवरील या जोडीचा २१-१९, २४-२२ असा ५४ मिनिटांत पराभव करून नव्या हंगामात स्थान मिळवले. रेन आणि तांग या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी जोरदार बचावात्मक कामगिरी करूनही भारताच्या या स्टार खेळाडूंनी अखेरपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवत सामना जिंकला. भारताच्या या दुहेरी जोडीचे प्रशिक्षक मॅथियास बोए यांनी उत्तम प्रशिक्षण दिल्याचे यावेळी दिसून आले.
सामन्यात जेव्हा सात्विक आणि चिरागने रेन आणि तांगला तिसऱ्या गेममध्ये मात देत चौथ्या मॅच पॉइंटच्या रूपात विजय मिळवला. दरम्यान, यावेळी तेथे उपस्थित सर्व भारतीय चाहत्यांनी आनंद साजरा केला. चिरागने तर थेट टीशर्ट काढून आपला आणि देशाचा विजय साजरा केला. सात्विक आणि चिराग यांचे हे बासेलमधील पहिले विजेतेपद होते आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये फ्रेंच ओपन सुपर ७५० च्या विजयानंतर या दौऱ्यातील त्यांचे पहिले विजेतेपद होते.
दिग्‍गज खेळाडू स्‍पर्धेतून बाहेर
स्वीस ओपन सुपर सीरिज स्पर्धेत भारताचे दिग्‍गज खेळाडू आधीच बाहेर पडले होते. महिला एकेरीत पीव्ही सिंधू आणि पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, मिथुन मंजुनाथ पराभूत झाले होते. अशा परिस्थितीतही सात्विक-चिराग जोडीने उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन करत दुहेरी भारताचा दबदबा कायम राखत चीनी जोडीला पराभूत केले.
सात्‍विक-चिराग जोडीचे पाचवे जागतिक विजेतेपद
सात्विक आणि चिराग यांचा गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये पराभव झाला होता. २०१९ मधील थायलंड ओपन आणि २०१८ मधील हैदराबाद ओपन तसेच गेल्या वर्षी इंडिया ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकलेल्या सात्विक-चिराग जोडीचे हे कारकिर्दीतील पाचवे जागतिक विजेतेपद आहे. जागतिक क्रमवारीत ६व्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने २०२२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकासह तब्बल ३ विजेतेपदे जिंकली. त्यांनी जागतिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळवले. दरम्यान सात्विक दुखापतीच्या चिंतेने त्रस्त होता. ज्यामुळे त्याला फेब्रुवारी २०२३ मध्ये बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपला मुकावे लागले होते.