मशिनरी बंद, सोनसडो प्रकल्प ठप्प !

कामिल बर्रेटो : मडगाव पालिकेच्या स्वच्छता समितीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांची माहिती


31st January 2023, 12:25 am
मशिनरी बंद, सोनसडो प्रकल्प ठप्प !

स्वच्छता समितीच्या बैठकीत चर्चा करताना नगरसेवक व पालिका अभियंता. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
मडगाव पालिकेच्या स्वच्छता समितीची बैठक कामिलो बर्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीवेळी पालिका अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनसडो येथील प्रकल्पाच्या ठिकाणी मशिनरी बंदावस्थेत असल्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. ओल्या कचऱ्याची केवळ साठवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. मशिनरी दुरुस्त करून किंवा नवीन मशिनरी घेऊन प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे कामिल बर्रेटो यांनी सांगितले.
मडगाव पालिकेच्या स्वच्छता समितीची बैठक सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीनंतर समिती अध्यक्ष बर्रेटो यांनी सांगितले की, पालिका क्षेत्रातील लोकांना ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी, कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती घेत असताना सोनसडो येथील प्रकल्प सुरू नाही याची माहिती मिळालेली आहे. सुक्या कचऱ्यावर बेलिंग प्रक्रिया करून त्याची वाहतूक दुसरीकडे केली जाते. पण, सोनसडो येथील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीची मशिनरी चालत नाही. त्यामुळे ओला कचरा शेडमध्ये नेवून साठवणूक केली जात आहे. त्यावर प्रक्रिया केली जात नाही. सोनसडो प्रकल्पातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी असलेली मशिनरी दुरुस्ती करायची किंवा त्याजागी दुसरी मशिनरी आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय प्रकल्पात बाहेरील बाजूला असलेल्या कचऱ्यापैकी बहुतांशी कचऱ्यावर प्रक्रिया करून इनर्टचाही वापर आवश्यक त्या ठिकाणी करण्यात आल्याने जागा मोकळी होत आहे.
सेप्टीक टँक ओव्हर फ्लो झाल्यास संबंधितांना दंड
सेप्टीक टँक ओव्हर फ्लो झाल्यास त्याचा त्रास परिसरातील लोकांना होत असतो. सांडपाणी जोडण्या अद्यापही देण्यात आलेल्या नाही. मात्र, सेप्टीक टँक ओव्हर फ्लो होण्याआधी सदर इमारतींनी किंवा घरमालकांनी त्यावर उपाय केले पाहिजे. सेप्टीक टँक ओव्हर फ्लो झाल्यास सदर घराची पाणीजोडणी तोडण्याची किंवा दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतलेला आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिका क्षेत्रातील स्वच्छतागृह आहेत का व किचनही स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याने त्याचीही तपासणी करण्यास स्वच्छता निरीक्षकाला सांगण्यात आलेले आहे. याशिवाय मलेरिया, डेंग्यू अशा साथरोगांसाठी आवश्यक ती फवारणी वेळोवेळी करण्याच्या सूचना केलेल्या असून औषध किंवा इतर सामग्रीची कमी असल्यास समितीला माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
मोकाट जनावरांसाठी सुविधा
पालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा मुलांना, वृद्धांना त्रास होतो. त्यामुळे भटकी कुत्री, मोकाट गुरांचा प्रश्नही हाताळण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांना लसीकरणासाठी व इतर सुविधांसाठी नेमलेली एजन्सीचे मागील पैसे देण्यात आलेले आहेत व पुन्हा काम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय सोनसडो येथे ३० हजार चौरस मीटर जमीन आहे, त्यातील काही जमीन वापरात असून उर्वरित जमीनही वापरात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याठिकाणी मोकाट गुरांसाठी कोंडवाडा, भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर व इतर सुविधा उभारण्यात येऊ शकतात. एसजीपीडीए येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू नव्हता. त्याच्या प्रक्रियेत सुधारणा आणण्यात येणार आहे.

बाहेर कचरा टाकणाऱ्यांना ५ हजारांचा दंड
घरोघरी कचरा संकलनासाठी दोन एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. घरोघरी कचरा संकलन केल्यानंतरही पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आढळून येतात. याविषयी चर्चा केली असता पालिका क्षेत्राबाहेरील कचरा ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी आणून टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशाप्रकारे कचरा आणून टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांना पाच हजाराचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय घरोघरी कचरा संकलन थोडे उशिरा झाल्यास घरातील सर्व कचरा लोकांना देता येणार आहे, त्यावरही उपाय काढण्यात येणार आहे. ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी कचरा न टाकण्याचे बॅनर्स लावण्यात येणार आहेत.