कला अकादमीच्या दर्यासंगमावर लाेकाेत्सवाचे उद्घाटन

पारंपरिक वस्तूंना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देणार : मुख्यमंत्री


31st January 2023, 12:21 am
कला अकादमीच्या दर्यासंगमावर लाेकाेत्सवाचे उद्घाटन

लोकोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत राज्यपाल कलराज मिश्रा, मंत्री गोविंद गावडे. (नारायण पिसुर्लेकर)

प्र​तिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
गोव्यातील पारंपरिक कलाकारांच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक कलाकारांना सरकारतर्फे सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित केलेल्या लाेकाेत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बाेलताना सांगितले. यावेळी त्यांच्या साेबत राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, कला व संस्कृती मंत्री गाेविंद गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही ‘वाेकल फॉर लाेकल’ हा कार्यक्रमही राबवित आहोत. स्वयंपूर्ण गाेवा अभियानांतर्गत अनेक स्वयंपूर्ण मित्र पारंपरिक व्यावसायिकांना तसेच कलाकारांना मार्गदर्शन करत आहेत. राज्य सरकारच्या वि​विध याेजनांचा लाभ या कलाकारांना मिळवून दिला जात आहे. लाेकाेत्सवासारख्या कार्यक्रमातून कलाकारांना याेग्य ते व्यासपीठ मिळवून दिले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दर्यासंगामावर थाटली विविध ६०० दालने
दर्यासंगमावर आयोजित केलेला हा लाेकाेत्सव ८ फेब्रुवारीपर्यंत असणार असून यामध्ये एकूण ६०० दालने लावण्यात अाली आहेत. यात जास्तीत जास्त दालने ही गोमंतकीय कलाकारांची आहेत. या महोत्सवात पारंपरिक वस्तूची दालने मांडण्यात अाली आहे. विविध राज्यांतील खाद्य संस्कृतीचे दर्शनही येथे घडत आहे. त्याचप्रमाणे हस्तकलेपासून तयार केलेल्या अनेक वस्तू आणि विविध कपड्यांची दालने या लाेकाेत्सवात थाटण्यात अाली आहेत.