कार्निव्हल मिरवणुका १८ फेब्रुवारीपासून

शिमगाेत्सव मिरवणुकांना ८ मार्चपासून फोंड्यातून प्रारंभ


31st January 2023, 12:07 am
कार्निव्हल मिरवणुका १८ फेब्रुवारीपासून

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यात १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा या चार प्रमुख शहरांमध्ये कार्निव्हल होणार आहे. तर ८ मार्चपासून शिमगोत्सव मिरवणुका हाेणार आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पणजी शहरात १८, मडगावमध्ये १९, वास्कोत २० आणि म्हापसा येथे २१ रोजी कार्निव्हल होणार आहे. कार्निव्हल फ्लोट्सचा दर्जा खालावू नये याकरीता यावर्षी चांगल्या दर्जाच्या फ्लोट्सवर भर देण्यात येईल. समित्यांना त्यांच्या संबंधित शहरातील कार्निव्हलच्या मार्गांची आर्थिक जबाबदारी देण्यात आली आहे आणि गोवा सरकार त्यांना पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांच्या बाबतीत मदत करेल, असेही निखिल देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी बऱ्याचशा समित्यांनी गोवा पर्यटनाला सांगितले की, ते त्यांच्या पारंपरिक मार्गावरच मिरवणूक आयोजित करणार आहेत. आम्ही मार्गांचा आढावा घेतला असून समित्यांना पोलीस विभागाशी समन्वय साधण्यास सांगितले आहे. राज्यात १७ ठिकाणी कार्निव्हलच्या मिरवणुका हाेणार आहेत. तर शिमगोत्सवाची प्रथम मिरवणूक ८ मार्च रोजी फोंडा शहरातून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रात्री १० नंतर मिरवणुका काढण्यास परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, सदर मिरवणूक १० नंतर होणार नाही याची सुनिश्चितता करण्यात येणार आहे, असेही निखिल देसाई यांनी सांगितले.