वेंगुर्लेतील मानसीश्वर जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी

पेट्रोमॅक्सच्या उजेडात रंगले दशावतारी नाटक


30th January 2023, 11:54 pm
वेंगुर्लेतील मानसीश्वर जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी

पेट्रोमॅक्सच्या उजेडात सुरू असलेले दशावतारी नाटक.


न्यूज डेस्क । गोवन वार्ता

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले उभादांडा येथील प्रसिद्ध असलेली मानसीश्वराची जत्रा म्हणजेच बत्तीची जत्रा म्हणून महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध आहे. रविवारी हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. भाविकांची या जत्रेला मोठी गर्दी करत मानसीश्वराचे दर्शन घेतले.

दरम्यान, रात्री जत्रोत्सवाचे आकर्षण उभारण्यात येणारी भगव्या रंगाच्या निशाण काठी व बत्तीच्या (पेट्रोमॅक्स) प्रकाशात केले जाणारे दशावतारी नाटक हे आहे. रविवारी रात्रौ हे नाटक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.जत्रोत्सवाच्या आदल्यादिवशीपासून काही दुकाने सुरू झाल्याने याठिकाणी जत्रोत्सवाचा माहोल निर्माण झाला होता. रविवारी पहाटेच जत्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मानाची निशाणे अर्पण केल्यानंतर उर्वरित भाविकांनी केळी, नारळ, निशाणे अर्पण करण्यास सुरुवात केली. जत्रोत्सवानिमित्त नारळ, केळी, निशाणे याबरोबरच विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू, मिठाई, हॉटेल्स यांची दुकाने मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली होती. देवदर्शनानंतर भाविकांनी येथील विविध दुकानांना भेटी देत मोठ्या प्रमाणात खरेदी करीत खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटला.

वेंगुर्ला सागरकिनारी मानसीश्वराचे स्थान आहे. येथे होणाऱ्या जत्रेसाठी ग्रामस्थांकडून पेट्रोमॅक्सच्या गॅसबत्ती देण्याबरोबरच मानसीश्वराच्या नावाने ‘शिड’ (भगवे निशाण) उभे केले जाते. त्यामुळे या जत्रेला ‘बत्तीची जत्रा’ तसेच ‘शिडाची जत्रा’ असेही संबोधले जाते. परंपरेचे पालन करताना भाविकांचा महापूर असताना मानसीश्वराच्या स्थानावर गजबजाट आढळून येत नाही व दिव्यांची मोठी रोषणाई दिसून येत नाही. श्री देव मानसीश्वराच्या स्थानी असंख्य भगवी निशाणी दिसून येतात. ही निशाणे म्हणजे देवदेवतांचे झेंडे मानले जातात. भाविकांची नवसपूर्ती झाल्यानंतर मानसीश्वराच्या स्थानावर निशाण काठी रोवण्याची प्रथा आहे.

मानसीश्वर येथील जत्रा झाल्यानंतर रात्री बारानंतर देवस्थानाच्या ठिकाणी कोणीही जात नाही व आवाजही करत नाहीत. याच कारणास्तव देवस्थानाच्या ठिकाणी दशावतारी नाटक होत नाही, तर दुसर्‍या ठिकाणी होते व त्याचठिकाणी भाविकांकडून बत्ती लावण्यात येतात. नवस केलेल्या भाविकांकडून बत्ती घराकडून आणण्यात येते किंवा जत्रेच्याठिकाणी बत्ती सुमारे ३०० ते ५०० रुपयांपर्यंत भाड्याने बत्ती उपलब्ध हाेते.