रशियाहून आला अन् मराठी शाळेत रमला

आजगाव येथील शाळेत मिराॅन प्रार्थना, कवायतीसह गिरवतोय शिक्षणाचे धडे


30th January 2023, 11:53 pm
रशियाहून आला अन् मराठी शाळेत रमला

आजगाव शाळेतील मुलांसह कवायत करताना रशियातील मुलगा मिराॅन.


न्यूज डेस्क । गोवन वार्ता

सावंतवाडी : रशियातील मिरॉन नामक अकरा वर्षाचा मुलगा आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला. परंतु, भ्रमंतीऐवजी सिंधुदुर्गातील आजगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. यातून तो भारत- रशिया या देशांच्या घट्ट मैत्रीची प्रचिती छोटा दूत बनून देत आहे.

सिंधुदुर्गमधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सध्या गावातील मुलांबरोबरच हा रशियन चिमुकला अध्ययन करत आहे.

मिराॅन सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशियाहून आला होतो. आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना गोव्याशेजारील असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील शाळेने मात्र त्याला आकर्षित केले. आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे आता गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतो आहे. वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही. मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहिण्या बोलण्यासाठी शिकला आहे. येथील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ यावरही तो प्रेम करू लागला आहे.

शाळेत होणारी प्रार्थना देखील त्याने पाठ केली आहे. शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार सुद्धा मुलांसोबत बसून तो आवडीने खातो.

चार महिन्यानंतर त्याला रशियात परत जावे लागणार आहे; परंतु पुन्हा संधी मिळाली, तर मी नक्कीच परत येईन, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. त्याची भारतीय भाषा शिकण्याची आवड बघून त्याला जिल्हा परिषद शाळेत त्याला तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे पालन ही जिल्हा परिषद शाळा करत आहे, असे दिसून येते.