कोरगावात म्हादईबाबतचा ठराव‍ संमत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कर्नाटक येथील वक्तव्याचा ग्रामसभेत निषेध


30th January 2023, 12:06 am
कोरगावात म्हादईबाबतचा ठराव‍ संमत

कोरगाव ग्रामसभेत निषेध ठराव मांडताना सुदीप कोरगावकर. 


प्रतिनिधी। गोवन वार्ता
कोरगाव :
म्हादई नदीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक येथे केलेल्या वक्तव्याचा कोरगाव ग्रामसभेत निषेध करणारा ठराव संमत करत भाजप सरकारचाही निषेध करण्यात आला. याशिवाय कोरगाव पंचायत ग्रामसभेत पाणी, रस्ते तसेच पंचायत कायदा आदी विषयांवर चर्चा करत कोरगाव ग्रामसभा पार पडली.
येथील देऊळवाडा श्री कमळेश्वर सभागृहात रविवारी कोरगावचे सरपंच समील भाटलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत व्यासपीठावर उपसरपंच कल्पिता कलशावकर, पंच देविदास नागवेकर अब्दुल नाईक, तृप्ती नर्से, अनुराधा कोरगावकर, उमेश च्यारी, दिवाकर जाधव, लौकिक शेट्ये, सचिव श्रद्धा कोरगावकर, निरीक्षक सुभाष तळकर उपस्थित होते.
या सभेत ग्रामस्थांतर्फे सुदीप कोरगावकर, लक्ष्मण गावडे, व्यंकटेश घोडगे, रामचंद्र गोसावी, विनिता मांद्रेकर, सोनू तळवणेकर, नरेश कोरगावकर, जगदीश तोरस्कर, देवानंद गावडे, राजू नर्से आदींनी चर्चेत भाग घेतला.
दरम्यान, सभा सुरू होण्यापूर्वी ग्रामसभेला अल्प ग्रामस्थ असल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सदर ग्रामसभा नियमानुसार होत असल्याचे सचिव कोरगावकर यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ सुदीप कोरगावकर यांनी कर्नाटक सरकारने म्हादई नदीबाबतचा डीआरपी त्वरित रद्द करण्याची मागणी करत कर्नाटक येथे झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक सरकारच्या बाजूने केलेल्या वक्तव्याचा तसेच भाजप सरकारचाही जाहीर निषेध करणारा ठराव मांडला व तो ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.
यावेळी कोरगावकर यांनी २०० केव्हीचा नवीन ट्रान्स्फाॅर्मर बसविण्याचा मुद्दा मांडला होता. तसेच पंचायत क्षेत्रातील रस्त्यावरील गतिरोधक रंगविण्यात यावे जेणेकरून अपघात टळतील. भाईवाडा स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध करावी, असा ठराव पंढरी आरोलकर यांनी मांडला. देऊळवाडा-कोरगाव तसेच पंचायत क्षेत्रातील अन्य रस्ते रस्ते हाॅटमिक्स करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
बेकायदेशीर घरांना नंबर देण्यात आले असून त्यावर त्वरित कारवाई करावी. पंचायत कायद्यानुसार त्रैमासिक जमा-खर्चाचे प्रत्येक ग्रामसभेत वाचन करावे. अशी मागणी सुदीप काेरगावकर, रामंचंद्र गोसावी आणि महादेव गवंडी यांनी केली. पंचायतीमार्फत कोणती कामे केली त्यांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी व्यंकटेश घोडगे यांनी केली असता अद्यापपर्यंत पंचायतीला फंड आला नसल्याचे सरपंच समील भाटलेकर यांनी सांगितले.
सुरुवातीला सरपंच समील भाटलेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव श्रद्धा कोरगावकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले व ते कायम करण्यात आले. त्यानंतर विविध विषयांवर झालेल्या चर्चेअंती पंच लौकिक शेट्ये यांनी आभार मानले. बॉक्स.....
भूखंड योजनेंतर्गत बांधलेल्या घरांची विक्री
कोरगाव पंचायत क्षेत्रात २० कलमी योजनेंतर्गत भूखंड योजनेखाली कोरगावात बारा घरे बांधण्यात आली होती. सदर घरे १२ जणांनी देण्यात आली होती. मात्र, त्यातील काही घरांची विक्री करण्यात आली आहे. त्या घरात कोण रहातात, तसेच सदर घरे कोणी कोणाला विकली याची चौकशी उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी तसेच पेडणे तालुका अधिकारी यांच्यामार्फत करावी, असा ठरावा सुदीप कोरगावकर यांनी मांडला. त्यावर चर्चा करून चौकशी करण्याचे ठरविण्यात आले.