म्हादईप्रश्नी सुर्लावासीय मुख्यमंत्र्यांसोबत

राजकारण न करता संघटित लढा देण्याची गरज


30th January 2023, 12:04 am
म्हादईप्रश्नी सुर्लावासीय मुख्यमंत्र्यांसोबत

सुर्ला ग्रामसभेत बोलताना पंचायत सदस्य.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली :
डिचोली सुर्ला पंचायतीची ग्रामसभा रविवारी पंचायत सभागृहात सरपंच विश्रांती सुर्लकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी म्हादई विषयावर सर्व ग्रामस्थ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोबत असून संपूर्ण गोव्यातील लोकांनी कोणतेही राजकारण न करता या विरोधात एकत्रित लढायला हवे, असा सूर डिचोली-सुर्ला पंचायतीच्या ग्रामसभेत उमटला.
दरम्यान, यावेळी ग्रामसभेत सिमेंट फॅक्ट्रीत ठेकेदार पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना कायम करणे, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पायवाटा, रस्ते, वीज समस्या, शेतकऱ्यांना खत वाटप आदी विषयांवर जोरदार चर्चा होऊन या विषयावर ठराव मांडण्यात आले.
सुरुवातीला सरपंच सुर्लकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव महादेव नाईक यांनी मागील सभेचा अहवाल वाचन केला आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच भोला खोडगीणकर, सुभाष फोंडेकर, शाणू सुर्लकर, दिनेश मडकईकर, साहिमा गावडे, सुचिता गावकर आदी उपस्थित होते.
स्थानिकांना विश्वासात घेऊन खाण विषय हाताळा
खाण कंपन्यांनी यापूर्वीच स्थनिकांची शेती, बागायती, जमीन उद्धवस्त केली आहे. त्यांचे अधिकारी गावात मनमानी कारभार चालवत असून पंचायत मंडळ आणि ग्रामस्थ यांच्यात भांडणे लावायचे काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला. यावेळी ग्रामस्थांनी काही खाण कंपन्यांनी बेकायदा खनिज मालाची विक्री केल्याचे पंचायत मंडळच्या निदर्शनासही आणून दिले. त्यामुळे यापुढे गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच खाणीविषयी परवाने देणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी सभेत व्यक्त केले.
पाण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवावा
सुर्ला पंचायत क्षेत्रात ८० टक्के लोक शेतकरी आहेत. सुमारे ६० टक्के लोकांच्या घरी विहिरी आहेत. २० टक्के लोक ओहोळ, झरे, तळी तर जास्तीत जास्त लोक सरकारने दिलेल्या पाण्याचा वापर करतात अशा परिस्थिती म्हादई नदीचे पाणी वळवल्यास उन्हाळ्यात सुर्लावासीयांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील यासाठी या विषयावर खास ग्रामसभा घेऊन जनजागृती कार्यक्रम हाती घ्यावा, यासाठी मार्गदर्शन म्हणून पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांना आमंत्रित करावे, असेही सुचवण्यात आले.