करा असेही ...

Story: घराबद्दल बरेच काही | गौरी भालचंद्र |
27th January 2023, 10:48 pm
करा असेही ...

घरामध्ये रंग करविताना आजकाल एखादी भिंत ‘ हाय लाईट ‘ करविण्याची ट्रेंड आहे. घरामधील रंगसंगती शक्यतो हलक्या रंगांची असावी. आपल्याला गडद रंग आवडत असतील तर त्यांचा वापर भिंतींसाठी न करता सोफ्याचा रंग, किंवा कुशन्स, पडदे या ठिकाणी करावा. भिंतींवर हलके रंग वापरल्याने खोली जास्त मोठी आणि प्रकाशमान दिसते. त्यामुळे घराच्या भिंतींसाठी गडद रंग वापरणे शक्यतो टाळावे. गडद रंग भिंतीवर वापरायचाच असेल, तर एखादी भिंत दर्शनी भिंत म्हणजेच मेन वॉल  गडद रंगाने हायलाईट करावी, व त्या रंगाला शोभतील अशा हलक्या रंगाने इतर भिंती रंगवून घ्याव्यात.

आपल्याकडे पारंपरिक, अँटिक वस्तू मोठ्या प्रमाणात असतील, तरी त्या सगळ्या वस्तू एकाच वेळी, एकाच ठिकाणी ठेवायलाच हव्यात असे नाही. काही वस्तू काही काळाकरिता मांडून ठेवून, त्यानंतर त्या वस्तू आतमध्ये ठेवून देऊन त्या जागी दुसऱ्या वस्तू मांडता येतील. असे केल्याने दर काही काळाने आपल्या घराचा लुक सुद्धा  बदलत राहील, आणि आपल्या घरामध्ये खूप वस्तू भरून ठेवल्या आहेत असे पाहणाऱ्याला वाटणार नाही. आपल्या घराच्या इतर बाजूला साजेशा वस्तूंचा सजावटीमध्ये वापर करा. तसेच काही अँटिक पीस आपल्या सजावटीच्या थीमप्रमाणे डिझाईनसुद्धा करून घेता येतील. 

        घर नवीन असो वा वडिलोपार्जित त्याचा कोपरा अन् कोपरा कसा असावा, कसा दिसावा, याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक कुटुंब आपल्या आवडीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे घराची सजावट करत असतात. घराची सजावट करताना असंख्य गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. अनेकांना विशिष्ट प्रकारच्या तसबिरी, पेंटिग्ज लावण्याचा, काही खास मूर्ती स्थापन करण्याचा छंद असतो.

       आपल्या घराच्या सजावटीतून आपल्या आणि आपल्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्त्व सांगत असते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या विचासरणीला अनुरूप आहेत, अशाच वस्तूंनी घर सजवावे. कोणाला आधुनिक सजावट पसंत असेल, तर कोणाला पारंपरिक सजावट  पसंत असेल. या दोहोंचे मिश्रण जरी करावयाचे झाले, तरी ते काळजीपूर्वक करायला हवे. त्यामुळे फर्निचर आधुनिक ट्रेंडनुसार असले, तरी पारंपरिक पद्धतीने, किंवा तशा ‘थीम’ला अनुसरून बनविली गेलेली पेंटिंग्ज, गालिचे, शोभेच्या वस्तू, यांनी जुन्या-नव्याचा उत्तम संगम साधता येऊ शकतो.

          प्लास्टिकच्या फुलांचा वापर करायचाच असेल, तर तो अगदी मोजक्या प्रमाणात करावा. तसेच ही फुले दर पंधरा दिवसांनी साबणाच्या पाण्यामध्ये स्वछ धुवावीत. जर फुलांची हौस असेलच, तर ताज्या फुलांनी भरलेली फुलदाणी ठेवावी. तसेच घरामध्ये आकर्षक पद्धतीने, विचारपूर्वक केलेली फुलझाडांची किंवा शोभेच्या झाडांची मांडणी घराचे सौंदर्य अधिक खुलविते… 

       उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो. त्यामुळे सूर्य हा कमी वेळेसाठी बाहेर असतो. याचा अर्थ, तुम्हाला सुर्याबरोबर थोडा वेळ मिळाला ,तर त्याचा मोठा फरक पडेल. घरांचे पडदे सरकून द्या आणि लख्ख सूर्यप्रकाश आतमध्ये येऊ द्या. यामुळे घर उबदार राहण्यास मदत होईल. सूर्यास्त होताच पडदे पुन्हा लावून घ्या,त्यामुळे आतील उबदार हवा आतच राहील. 

                       आपण फिलामेंट असलेली दिवे वापरणे बंद केलेले आहे. त्याऐवजी आपण घरात CFL आणि LED दिवे वापरतो. पण सत्यता हि आहे कि, फिलामेंट असलेले दिवे प्रकाशाबरोबरच घरात थोडीशी ऊबही पुरवतात. जर तुम्ही घरातील दिवे बदलून, फिलामेंट असलेले दिवे लावलेत, तर घरातली ऊब वाढेल.

         उन्हाळ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी,आपल्या घरात हलकी आणि पातळ पडद्यांची गरज पडते. याउलट परिस्थिती हिवाळ्यामध्ये असते. हिवाळ्यातील गार वारे तुमच्या घराला थंड आणि असह्य बनवेल, त्यामुळे तुम्हाला जाड आणि वजन असलेल्या पडद्यांची गरज पडेल. हे पडदे विभाजनाचे काम करतील आणि थंड हवेला आतमध्ये येण्यापासून व घरातील उबदार हवेला बाहेर जाण्यापासून थांबवतील. जोवर आपण आपली फरशी इन्सुलेट करत नाहीत. घरातील फरशी / मजला थंडगार असल्या कारणाने, उबदार हवा ही तेथून गमावली जाते. हे घडण्यापासून रोखण्यासाठी घरात 

जिथे शक्य असेल तिथे कार्पेट, पसरून देणे, आणि फरशीची उघडी जागा झाकून टाकणे योग्य ठरेल.

    आपले घर सुंदर ठेवतानाचे आपले लहान मोठे सर्व प्रयत्न कारणी लागल्याचे समाधान आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्या घराची सजावट करताना काही लहान लहान गोष्टींचा काळजीपूर्वक केलेला विचार आपल्या घराला सुंदर बनविण्यात मदत करीत असतो…